
बेळगाव : वेळेत निदान, उपचारातून कुष्ठरोग बरा
बेळगाव जिल्ह्यात वर्षभरात १५९ जणांना कुष्ठरोग झाल्याचे निदान झाले. त्यात एप्रिल २०२१ ते जानेवारी २०२२ दरम्यान १४४ कुष्ठरोगी आढळले, तर फेब्रुवारी २०२२ या महिन्यातील विशेष ‘स्पर्श’ अभियानातून १५ जणांना कुष्ठरोग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कुष्ठरोगाबाबत जागृतीची गरज असून प्राथमिक पातळीवर त्याचे निदान होण्याची आवश्यकता आहे. जितक्या लवकर निदान होईल, तितक्याच लवकर रुग्ण बरा होऊ शकतो. त्यामुळे कुष्ठरोगासंदर्भात नियमित तपासणी आणि चाचण्या करणे गरजेचे ठरले आहे.
कुष्ठरोगाबाबत थोडक्यात
कुष्ठरोग अनादी काळापासून आलेला रोग असून, त्यामुळे व्यंगत्व येते. कुष्ठरोग इतर रोगापेक्षा वेगळा असला तरी त्याचे वेळीच निदान झाल्यास रुग्ण बरा होतो. मात्र, या रोगावर तातडीने उपचार नसून अशा रुग्णांवर अनेक महिने उपचार चालतात. हात किंवा पायाची बोटे वाकडी होणे, व्यंगत्व येणे किंवा चट्टे दिसण्याची शक्यता असते. १८७३ मध्ये मायक्रोबॅक्टेरियम लेप्रे या कुष्ठरोगाच्या जंतूचा शोध नार्वे येथील डॉ. हॅन्सल यांनी लावला. हा रोग मंदगतीने वाढत असून कुष्ठरोगींना ज्या ठिकाणी लागण होते, त्याठिकाणी संवेदना किंवा चेतना जाणवत नाहीत.
विशेष तपासणी अभियान
कुष्ठरोग दिनानिमित्त फेब्रुवारी महिन्यात विशेष वैद्यकीय तपासणी अभियान राबविण्यात आले होती. त्यासाठी जिल्हा व तालुका पातळीवर आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. तसेच या विशेष अभियानाला ‘स्पर्श’ असे नाव दिले होते. तीन आठवडे चालेलल्या या वैद्यकीय तपासणी अभियानात ८,३५,९६१ जणांची वैद्यकीय तपासणी केली. यात १५ जणांना कुष्ठरोग झाल्याचे निदान झाले. यापैकी सहा जणांना कुष्ठरोगाची लागण प्राथमिक अवस्थेत असून, त्यांच्यावर पुढील ६ महिने उपचार चालणार आहेत. तर आजार गंभीर व एकापेक्षा अधिक ठिकाणी कुष्ठरोगाचे चट्टे आढळून आलेल्यांची संख्या ९ असून त्यांच्यावर १ वर्षे वैद्यकीय उपचारचालणार आहे.
गैरसमज नको
कुष्ठरोगबाबत समाजात गैरसमज आहेत. मात्र, कुष्ठरोग स्पर्शाने परसत नाही. यावर प्रभावी वैद्यकीय उपचार विकसित झालेले आहेत. यामुळे पूर्वीप्रमाणे या रोगाबद्दल आता अंधश्रध्दा दिसत नाही.तसेच कुष्ठरोग अनुवंशिक नसून त्याच्याशी पाप-पुण्याचाही काही संबंध नाही. हा रोग नैसर्गिक रोगप्रतिकार शक्तीवर अवलंबून आहे. कुष्ठरोग हा सहा महिने ते एका वर्षात बरा होतो. यावरील उपचार सरकारी रुग्णालयात मोफत उपलब्ध आहेत.
कुष्ठरोगाची लक्षणे
चेहरा, हातपाय, छाती, पाठ याठिकाणी चट्टे रूपात जंतूची वाढ होणे.
कुष्ठरोगींचे चट्टे लालसर किंवा पांढरट, सुजलेले, चकचकीत दिसतात.
हातापायाची बधिरता (सुन्नपणा) वाढणे, बोटे वाकडी होणे.
चट्टे वाढलेल्या भागात संवेदना न जाणविणे.
कानाच्या पाळ्या जाड होणे.
जिल्ह्यात काही लोक कुष्ठरोगाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. यामुळे मंदगतीने रोग वाढत जातो. याबाबतची लक्षणे दिसून आल्यास प्राथमिक अवस्थेतच वैद्यकीय उपचार सुरु करणे योग्य ठरते. फेब्रुवारी व त्यापूर्वीही चाचण्या केल्या असून, त्यात बेळगाव तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.
- डॉ. चांदणी देवडी, जिल्हा कुष्ठरोग नियंत्रण अधिकारी
Web Title: Belgaum Diagnosis Time Cure Leprosy Through Treatment
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..