
बेळगाव : शिवसृष्टीचे आता तिसऱ्यांदा उद्घाटन
शहापूर: छत्रपती शिवाजी उद्यानातील शिवसृष्टीचे तिसऱ्यांदा उद्घाटन होणार आहे. एप्रिलअखेरीस होणाऱ्या या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निमंत्रण देणार दिले जाणार आहे. दहा दिवसांत उद्घाटनाची तारीख निश्चित होणार असल्याची माहिती आमदार अभय पाटील यांनी दिली आहे. शिवसृष्टी तसेच तेथील ध्वनी व प्रकाश योजनेसाठी दहा कोटी रुपये निधी खर्च झाल्याचे त्यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी उद्यानातील शिवसृष्टीची संकल्पना आमदार पाटील यांचीच आहे. पण, विविध कारणांमुळे काम दहा वर्षांपेक्षा जास्त काळापासून रखडले आहे. २०१३ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसृष्टीचे बांधकाम पूर्ण झाले, पण तेथील ध्वनी व प्रकाश योजना सुरु झाली नाही. शिवसृष्टीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील विविध प्रसंग रेखाटण्यात आले आहेत. त्याचे उद्घाटन २०१३ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी झाले. २०१३ च्या निवडणुकीत पाटील यांचा पराभव झाल्याने शिवसृष्टीचे काम पूर्ण करण्याकडे बुडाचे दुर्लक्ष झाले. २०१७ मध्ये महापालिकेतील मराठी नगरसेवकांनी शिवसृष्टीतील प्रलंबित कामे पूर्ण करण्याची मागणी केली. ती कामे पूर्ण झाल्यावर शिवजयंतीच्या मुहुर्तावर शिवसृष्टीचे उद्घाटन करण्याचा निर्णय घेतला. तत्कालीन जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या हस्ते २०१७ मध्ये शिवसृष्टीचे दुसऱ्यांदा उद्घाटन झाले.
त्यावेळी उद्यानात मोठा कार्यक्रमही झाला होता. शिवसृष्टी सामान्यांसाठी खुली करण्याचा निर्णयही त्यावेळी झाला होता. पण, उद्घाटनानंतर शिवसृष्टी पुन्हा बंद झाली. ध्वनी व प्रकाश योजनेत तांत्रिक समस्या निर्माण झाल्याचे कारण बुडाकडून देण्यात आले. गेल्या काही महिन्यांपासून ते काम पूर्ण करण्यासाठी बुडाकडून प्रयत्न सुरु होते. ते काम पूर्ण झाल्याची माहिती
मिळाली आहे.
Web Title: Belgaum Inauguration Shiv Srishti Third Time Now
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..