

बेळगाव : गेल्या काही दिवसांपासून कन्नड संघटनांच्या (kannad organisation) बंद असलेल्या उचापती पुन्हा एकदा सुरू झाल्या असून राजहंस गडाकडे (rajhans gad) जाणाऱ्या मराठी नामफलकाची शनिवारी काही लोकांनी नासधुस केली. त्यामुळे मराठी भाषिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. बेळगाव (belgaum) आणि इतर भागातून राजहंसगड आणि खानापूरकडे (khanapur) जाणाऱ्या लोकांची नेहमीच येळ्ळूर, सुळगामार्गे वर्दळ असते. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना कोणता रस्ता कोठे गेला आहे. याची माहिती मिळावी यासाठी देसुर येथील लोकांनी पुढाकार घेऊन काही महिन्यांपूर्वी रस्त्यावर दिशा दर्शक नाम फलक लावला होता. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या लोकांची सोय होत होती.
मराठी भाषेचा पोटशूळ उठलेल्या काहींनी शनिवारी सायंकाळी हा फलक मोडून काढीत रस्त्यावर फेकून दिला आहे. त्यामुळे येथून ये-जा करणाऱ्या नागरिकांतून फलक का काढण्यात आला याची चर्चा ऐकायला मिळत होती. मात्र रस्त्याच्या कडेला फलक टाकून देण्यात आल्याचे समजताच मराठी भाषिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत कोणीतरी अंधाराचा फायदा घेत अशाप्रकारे नाम फलक काढून टाकण्यापेक्षा सर्वजण असताना फलक काढून टाकण्याचा प्रयत्न करावा त्याला जशास तसे उत्तर देण्यात येईल असा इशारा दिला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून कन्नड संघटनांनी मराठी भाषिकांना विविध प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. महापालिकेसमोर अनधिकृतरीत्या लाल-पिवळा ध्वज लावण्यासह दुकाने व इतर ठिकाणी लावण्यात आलेल्या मराठी भाषेतील फलकांना काळे फासण्याचा प्रकार सुरू करण्यात आला होता. याबाबत मराठी भाषिकांनी तीव्र विरोध दर्शविला होता. याबाबत प्रशासनाकडे तक्रारही करण्यात आली होती. मात्र पोलिसांनी नेहमीच बघ्याची भूमिका घेतली असून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लॉकडाऊन असल्याने कन्नड संघटनांची कोल्हेकुई बंद होती. मात्र सर्व व्यवहार सुरू होताच पुन्हा एकदा अशाप्रकारे मराठी फलकांना टार्गेट जात असल्याने मराठी भाषिकातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. तसेच पोलिसांनी याबाबत तातडीने कारवाई करावी अन्यथा मराठी भाषिक रस्त्यावर उतरल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशाराही देण्यात येत आहे.
"या ठिकाणी नसल्यामुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे. लोकांना माहिती मिळावी यासाठी फलक लावण्यात आला होता. मात्र काही लोकांनी हा फलक काढून चुकीचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या समाजकंटकांवर कडक कारवाई करणे गरजेचे आहे."
- सतीश चव्हाण, ग्राम पंचायत सदस्य, देसुर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.