
बेळगाव : व्यापार संकुलातील दुकानगाळ्यांच्या लिलाव प्रक्रियेला न्यायालयाने स्थगिती दिल्याने महापालिकेचे पुन्हा एकदा हसे झाले आहे. याआधी जानेवारी २०२१ मध्ये झालेल्या लिलाव प्रक्रियेतही अशीच स्थिती उद्भवली होती. खंजर गल्लीतील ३९ गाळेधारकांनी महापालिकेच्या लिलाव प्रक्रियेला न्यायालयात आव्हान दिले होते, त्यावर न्यायालयाने लिलाव प्रक्रियेला स्थगिती दिली होती. ती स्थगिती उठविण्यासाठी महापालिकेला सव्वा वर्षाचा कालावधी लागला.
आताही चावी मार्केट, कोलकार मार्केट येथील गाळेधारकांनी लिलावाला स्थगिती आणली आहे. महात्मा फुले मार्केटमधील २९ पैकी १९ गाळ्यांचा लिलाव ११ मे रोजी झाले, पण दुसऱ्याच दिवशी जिल्हा न्यायालयाने महात्मा फुले मार्केटमधील लिलावालाही स्थगिती दिली. धारवाड रोड येथील याचिकाकर्त्यांने दाखल केलेल्या याचिकेमुळे संपूर्ण लिलाव प्रक्रियेलाच स्थगिती दिली आहे. अर्थात ही स्थगिती तात्पुरती असली तसेच स्थगिती उठविण्याची मुभा महापालिकेला दिली असली, तरी लिलाव प्रक्रियेत खंड पडला आहे.
गणपत गल्लीतील गाळेधारकांची याचिकाही न्यायालयात प्रलंबित आहे. लिलाव प्रक्रिया सुरू करण्याआधीच महसूल व कायदा विभागाने स्थगिती येऊ नये यासाठी उपाययोजना करणे आवश्यक होते, पण तसे झालेले नसल्यामुळे सातत्याने लिलाव प्रक्रियेला स्थगिती येत आहे. लिलाव केल्या जाणाऱ्या २६८ दुकानगाळ्यांतील बहुतेक सर्व गाळेधारक जुने भाडेकरू आहेत. ते गाळे सहजासहजी सोडणार नाहीत, हे नक्की आहे. त्यामुळेच लिलाव प्रक्रिया जाहीर झाल्यावर लगेचच गणपत गल्लीतील गाळेधारकांनी आणि नंतर उर्वरित गाळेधारकांनी न्यायालयात धाव घेतली. गणपत गल्ली व किर्लोस्कर रोड येथील दोन गाळ्यांना अनेक वर्षांपासून न्यायालयाची स्थगिती आहे. ती बाब महापालिकेच्या महसूल विभागाला ठाऊकच नाही. लिलावाच्या वेळी त्यांनी स्थगिती आदेश दाखविल्यामुळे महसूल विभागाची गोची झाली. अनुसूचित जाती व जमाती तसेच दिव्यांगांसाठी दुकानगाळे राखीव ठेवणे आवश्यक होते. यावरुन लिलावाच्या वेळी वाद झाल्यानंतर गाळे राखीव ठेवण्यात आले.
सावळागोंधळ चव्हाट्यावर
सध्याच्या गाळेधारकांना ५ टक्के अतिरिक्त रक्कम देऊन पुन्हा गाळा भाडेकराराने घेण्याची तरतूद आहे; पण अनेक गाळेधारकांना याची माहिती नाही. यासाठी संबंधित भाडेकरूने सात दिवस आधी पालिकेला पत्र देणे आवश्यक होते. मात्र, अनेकांनी लिलावावेळी दिलेले पत्र महापालिकेने स्वीकारले. यावरुन लिलाव प्रक्रियेतील सावळागोंधळ चव्हाट्यावर आला.