बेळगाव: पदवी विद्यार्थ्यांना ऑफलाईन प्रश्‍नपत्रिकेचे वितरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 राणी चन्नम्मा विद्यापीठ

बेळगाव: पदवी विद्यार्थ्यांना ऑफलाईन प्रश्‍नपत्रिकेचे वितरण

बेळगाव: राणी चन्नम्मा विद्यापीठाअंतर्गत (आरसीयु) असलेल्या महाविद्यालयात सद्या पदवी प्रथम वर्षाच्या परीक्षा सुरु आहेत. सुरुवातीच्या काही विषयांच्या प्रश्‍नपत्रिकेचा पुरवठा ई-मेलच्या माध्यमातून महाविद्यालयांना करण्यात आला. यासंबंधी ‘सकाळ’ने आवाज उठविल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून महाविद्यालयांना ऑफलाईन प्रश्‍नपत्रिकांचे वितरण केले जात आहे. यामुळे प्राध्यापक व विद्यार्थ्यातून देखील समाधान व्यक्त होत आहे.

यंदा पदवीच्या प्रथम वर्षातील परीक्षा २९ एप्रिलपासून सुरु झाल्या आहेत. मे महिन्यांच्या शेवटीपर्यंत या परीक्षा चालणार आहेत. मात्र, यंदा विद्यापीठाने प्रश्‍नपत्रिका ऑफलाईन न देता ऑनलाईन पद्धतीने प्राचार्यांच्या ईमेल आयडीवर पाठविल्या. २९ एप्रिलपासून आठ दिवस अशाच पद्धतीने प्रश्‍नपत्रिका आल्या. मात्र, यासंबंधी ‘सकाळ’च्या २९ एप्रिलच्या अंकात ‘परीक्षा आजपासून, प्रश्‍नपत्रिकांचे काय? या मथळ्याखाली तर १ मे च्या अंकात ‘प्रश्‍नपत्रिकेचा पुरवठा प्राचार्यांच्या ई-मेलवर’ या मथळ्याखाली बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. याची दखल आरसीयु प्रशासनाने घेतली. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून ऑफलाईन पद्धतीने प्रश्‍नपत्रिका येत आहेत.

विद्यापीठाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या कोणत्याही परीक्षेच्या प्रश्‍नपत्रिका परीक्षा सुरु होण्यापूर्वी विद्यापीठाने दोन दिवस आगोदर संबंधीत महाविद्यालयांना प्रश्‍नपत्रिकेचे वितरण करणे आवश्‍यक आहे. मात्र, विद्यापीठाकडून यावेळी सुरुवातीच्या काळात ऑनलाईन प्रश्‍नपत्रिकेचे वितरण केले. यामुळे प्राध्यापकांसह विद्यार्थ्यांतून आश्‍चर्य व्यक्त केले जात होते. पेपर सुरु होण्यापूर्वी १५ मिनिट अगोदर संबंधीत महाविद्यालयांच्या प्राचार्यांच्या ई-मेलवर ही प्रश्‍नपत्रिका पाठवून देण्यात आली. त्यानंतर महाविद्यालयात प्रश्‍नपत्रिकेची प्रिंट काढून विद्यार्थ्यांना त्याचे वितरण करण्यात आले. यामुळे विद्यापीठाने ऑफलाईनच प्रश्‍नपत्रिका द्याव्यात, अशी मागणी होत होती. यासंबंधी सकाळने देखील आवाज उठविला.

सुरुवातीला ऐच्छिक विषयांचे पेपर घेतले. प्रत्येक महाविद्यालयात ऐच्छिक विषयाचे २० ते २५ विद्यार्थी होते. त्यावेळी ईमेलवर आलेली प्रश्‍नपत्रिका प्रिंट काढून देण्यास अडचण आली नाही. मात्र, सक्तीच्या विषयाचे पेपर घेतल्यास त्या विषयाला सुमारे ३०० ते ४०० विद्यार्थी असतात. इतक्या विद्यार्थ्यांना १५ मिनिटांत झेरॉक्स काढून प्रश्‍नपत्रिका वितरीत करणे अशक्य असते. याचा विचारही विद्यापीठाने करावा व संबंधीत महाविद्यालयांकडे ऑफलाईन प्रश्‍नपत्रिका द्याव्यात, अशी मागणी जोर धरु लागली होती. याचा विचारही विद्यापीठाने केल्यामुळे सद्या ऑफलाईन पद्धतीने संबंधीत महाविद्यालयांकडे काही दिवस आगोदरच प्रश्‍नपत्रिका पाठवून देण्यात आल्या आहेत.

Web Title: Belgaum Offline Question Papers Graduate Students

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top