
बेळगाव : तलाठ्यांचे अधिकार वाढणार
बेळगाव : एकीकडे ग्रामपंचायत विकास अधिकाऱ्यांच्या अधिकारांत वाढ करीत तलाठ्यांचे अधिकार कमी केले जात असतानाच त्यांना प्रशासक म्हणून पद देण्याचे सूतोवाच महसूलमंत्री आर. अशोक यांनी केले आहे. त्यामुळे तलाठ्यांच्या अधिकारांत पुन्हा एकदा वाढ केली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
महसूल खात्यात तलाठ्याची नियुक्ती जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून केली जाते. त्यासाठी बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर पीडीओंची नियुक्ती ही स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून केली जात असून त्यासाठी पदवीधर उमेदवार आवश्यक असतात. २००८ साली ग्रामपंचायतीमध्ये पीडीओ पद अस्तित्वात आले. त्यासाठी ग्रामपंचायत सचिवांचे अधिकार कमी करण्यात आले. केंद्र आणि राज्य सरकारकडून ग्रामपंचायतींना आता थेट अनुदान दिले जात असल्याने पीडीओंच्या अधिकारात देखील वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचा दर्जा वाढविण्याचा प्रशासनाचा विचार असून त्यांना राजपत्रित अधिकारी दर्जा दिला जाणार आहे.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात महसूलमंत्री अशोक यांनी तलाठ्यांना प्रशासक म्हणून नियुक्त केले जाणार असल्याचे सूतोवाच केले आहे. त्यामुळे त्यांच्या अधिकारात देखील वाढ केली जाणार का, हा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने जन्म-मृत्यू नोंदणी अधिकारी म्हणून तलाठ्याकडे असलेले अधिकार नुकतेच पीडीओंकडे हस्तांतरित केले आहेत. केवळ महसूल खात्याशी संबंधित कामे आता तलाठी करू लागले आहेत. पीडीओंना राजपत्रित अधिकाऱ्यांचा दर्जा मिळाल्यास तलाठ्यांना देखील त्यांच्या हाताखाली काम करावे लागेल.
Web Title: Belgaum Revenue Minister Rights Talathas Increase
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..