पाच वर्षांच्या तुलनेत यंदाची आकडेवारी जास्त ; ‘लाचलुचपत’ मध्ये बेळगाव राज्यात अव्वल

अमृत वेताळ 
Friday, 8 January 2021

पाच वर्षांच्या तुलनेत ही आकडेवारी सर्वाधिक असून, लॉकडाउन काळातही सातत्याने कारवाईचे सत्र सुरूच ठेवले होते.

बेळगाव : भ्रष्ट शासकीय अधिकाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई करण्यात बेळगाव लाचलुचपत विभाग (एसीबी) राज्यात अव्वल ठरला आहे. गतवर्षी एकूण ७४ प्रकरणांबाबत कारवाई करीत लाचखोर कर्मचाऱ्यांना गजाआड केले आहे. पाच वर्षांच्या तुलनेत ही आकडेवारी सर्वाधिक असून, लॉकडाउन काळातही सातत्याने कारवाईचे सत्र सुरूच ठेवले होते.

सरकारी कार्यालयात एखादे काम घेऊन गेल्यास तेथील अधिकारी व कर्मचारी नागरिकांकडून पैशाची मागणी करतात. लाच देण्यास टाळाटाळ करणाऱ्यांना नियमांच्या चौकटीत अडकवून काम करुन देण्यास विलंब केला जातो. तसेच त्यांना सातत्याने सरकारी कार्यालयांच्या पायऱ्या झिजव्याला लागतात. त्यामुळे बहुतांश जण नसती उचापत नको म्हणून अधिकारी व कर्मचाऱ्यांना लाच देऊन आपले काम करुन घेतात. लाच मागणाऱ्याविरोधात तक्रार दाखल करण्यास पुढे येणाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे शासकीय कार्यालये भ्रष्टाचाराने पोखरली गेली आहेत.

हेही वाचा - केंद्राकडून शिष्यवृत्तीसाठी 59 हजार कोटींची तरतूद: सुनिल कांबळे -

गत वर्षात एसीबीच्या बेळगाव उत्तर परिक्षेत्रात येणाऱ्या पाच जिल्ह्यामध्ये सातत्याने धाडसत्र राबविले. न्यायालय आणि सरकारच्या आदेशानुसार बेळगाव, धारवाड, गदग, बागलकोट आणि विजापूर जिल्ह्यात एकूण ७४ प्रकरणांवर कारवाई करण्यात आल्या. यामध्ये बेळगाव जिल्ह्यात तब्बल २२ ठिकाणी छापे टाकून कारवाई झाली. गतवर्षी लॉकडाउन व कोरोनाकाळातही चार वर्षाच्या तुलनेत बेळगाव विभागात एसबीच्या कारवाईची संख्या सर्वाधिक अधिक आहे.

दरम्यान, जमिनीचा हक्‍कबदल करुन देण्यास आठ हजार रुपयाची लाच स्वीकारणाऱ्या बोरगाव (ता. चिक्‍कोडी) येथील शिवलिंगय्या बोरगावी या तलाठ्यावर छापा टाकून २०१६ मध्ये त्याला रंगेहात अटक केली होती. याची न्यायालयात सुनावणी होऊन दोन महिन्यापूर्वी तलाठ्याला शिक्षा सुनावली आहे.

"शासकीय कार्यालयात बोकाळलेल्या भ्रष्टाचारावर आळा घालण्यासाठी ‘एसीबी’चे प्रयत्न सुरू आहेत. सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी लाच देण्याची मागणी करीत असल्यास संबंधितांनी ‘एसीबी’कडे तक्रारी कराव्यात. संबंधितावर तातडीने कारवाई करून कामे मार्गी लावून देण्यात येतील."

- बी. एस. न्यामगौडर, अधीक्षक, ‘एसीबी’

हेही वाचा - पत्नी सुबोधाने दिली कबुली 

 

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: belgaum top one city in bribery before five years this year rate increased in belgaum