esakal | 'बुडा' बैठक तिसऱ्यांदा रद्द; अध्यक्ष होसमनी, आमदार आक्रमक : Belgaum news
sakal

बोलून बातमी शोधा

कणबर्गी निवासी योजनेची माहिती घेताना आमदार सतीश जारकीहोळी व आमदार लक्ष्मी हेब्बाळकर. समवेत अध्यक्ष गुळाप्पा होसमनी, आयुक्त प्रीतम नसलापुरे व अन्य.

'बुडा' बैठक तिसऱ्यांदा रद्द; अध्यक्ष होसमनी, आमदार आक्रमक

sakal_logo
By
मल्लिकार्जुन मुगळी

बेळगाव : बेळगाव (Belguam) नगरविकास प्राधिकरणची अर्थसंकल्पीय बैठक सोमवारी (ता.११) तिसऱ्यांदा रद्द झाली. आमदार अभय पाटील, आमदार अनिल बेनके व बुडाचे सदस्य अनुपस्थित राहिल्यामुळे गणपूर्ती झाली नाही. त्यामुळे अध्यक्ष गुळाप्पा होसमनी यांनी बैठक रद्द केली. कॉंग्रेसचे आमदार सतीश जारकीहोळी व लक्ष्मी हेब्बाळकर (Satish Jarkiholi, Lakshmi Hebbalkar) यानी बुडा कार्यालयात जावून अध्यक्ष होसमनी, आयुक्त प्रीतम नसलापुरे यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यानी प्रामुख्याने कणबर्गी (Kanbargi)निवासी योजनेबाबत चर्चा केली. बुडा अध्यक्ष होसमनी व भाजपचे आमदार अभय पाटील व अनिल बेनके यांच्यातील मतभेदांमुळे बुडा बैठकीबाबत अनिश्‍चितता होतीच. बैठक न झाल्यामुळे आमदार सतीश जारकीहोळी यानी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.

बुडाच्या पुढील बैठकीला जर भाजपचे दोन्ही आमदार उपस्थित राहिले नाहीत तर मात्र त्या विरोधात कायदेशीर इलाज केला जाईल असा इशारा त्यांनी दिला. गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात बुडाची बैठक झाली होती, त्यानंतर बैठकच झाली नसल्याचेही जारकीहोळी म्हणाले. याआधी १३ ऑगस्ट रोजी बुडाची अर्थसंकल्पीय बैठक आयोजित करण्यात आली होती. पण बैठकीच्या आदले दिवशी म्हणजे १२ रोजी तत्कालीन आयुक्त जी. टी. दिनेशकुमार यांची बदली झाली. त्या कारणास्तव बैठक रद्द करण्यात आली. २७ सप्टेबर रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. पण त्या बैठकीलाही भाजपचे दोन्ही आमदार व बुडाचे सदस्य उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे गणपूर्तीअभावी त्यावेळीही बैठक रद्द झाली होती.

नियोजित बैठक तिसऱ्यांदा रद्द झाल्यामुळे बुडा अध्यक्ष होसमनी यानीही तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली. बैठकीची माहिती आमदारांना देण्यात आली होती. आमदार व सदस्य बैठकीला आले नाहीत त्यामुळे बैठक रद्द करावी लागली. २५ ऑक्टोबरपर्यंत बैठक लांबणीवर टाकण्यात आली आहे. आमचेच सरकार सत्तेत असूनही आमचे आमदार बैठकीला गैरहजर राहतात हे अयोग्य आहे. अशा प्रकारामुळे विकासावर परीणाम होतो असे होसमनी म्हणाले. चालू आर्थिक सहा महिने संपले तरी अद्याप बुडाचा अर्थसंकल्प मंजूर झालेला नाही.

बहुचर्चित व पंधरा वर्षे प्रलंबित कणबर्गी निवासी योजनेच्या कामाला सुरूवात झालेली नाही. त्यामुळे सोमवारची बुडा बैठक होणे आवश्‍यक होते. बैठक न झाल्यामुळे बुडाच्या विकासकामांशी संबंधित अनेक विषय प्रलंबित रहिले आहेत. बुडा अध्यक्ष व शहराचे दोन्ही आमदार भारतीय जनता पक्षाचेच आहेत. पण त्यांच्यात खूप मतभेद असल्याचे गेल्या तीन चार महिन्यातील घडामोडींवरून स्पष्ट झाले आहे. पण आता ही बाब कॉंग्रेसच्या आमदारांनी गांभिर्याने घेतली आहे. त्यामुळे पुढील बैठकीत या विषयावरून गदारोळ होण्‍याची शक्यता आहे.

loading image
go to top