बेळगाव : शुद्धीकरणातून जाणाऱ्या पाण्याची नासाडी कायम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शुद्धीकरण प्रकल्पातून बाहेर पडणारे पाणी आधी वाया जात होते

बेळगाव : शुद्धीकरणातून जाणाऱ्या पाण्याची नासाडी कायम

बेळगाव: लक्ष्मीटेकडी येथील शुद्धीकरण प्रकल्पातून वाया जाणारे पाणी थांबविण्यात एल ॲण्ड टी कंपनीला यश आलेले नाही. पण, हिंडलगा रस्त्यावरून वाहत जात असलेले पाणी थांबविण्यासाठी मात्र कंपनीकडून प्रयत्न झाले. प्रकल्पातील पाणी वाहून अरगन तलावात जाण्यासाठी जो पाट तयार करण्यात आला, त्याची रुंदी वाढविण्यात आली आहे. त्यामुळे पाणी पाटातून बाहेर पडून रस्त्यावर वाहून जाण्याचा प्रकार थांबला. शुद्धीकरण प्रकल्पातील पाण्याची नासाडी होत असल्याचे वृत्त ‘सकाळ’ने १७ मार्चला ‘रिसायकलिंग टॅंक असूनही पाण्याची नासाडी’ या मथळ्याखाली प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत ही कार्यवाही करण्यात आली आहे.

लक्ष्मीटेकडी येथील शुद्धीकरण प्रकल्पातून बाहेर पडणारे पाणी आधी वाया जात होते. ते थांबविण्यासाठी रियासकलींग टॅंक बांधण्यात आले आहे. त्यासाठी तब्बल ४५ लाख रुपये निधी खर्च झाला. टॅंकचा वापर सुरू झाल्यापासून प्रकल्पातील पाणी बाहेर येणे बंद झाले होते.

पण गेल्या आठवड्यात पुन्हा प्रकल्पातून पाणी बाहेर येऊ लागले. पाटातून ते पाणी अरगन तलावात जात आहे. पण, पाट नादुरुस्त झाल्याने पाणी रस्त्यावरून वाहत होते. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. सध्या लक्ष्मीटेकडी येथील जलशुद्धीकरण प्रकल्प तसेच ‘रिसायकलींग टॅंक’ची जबाबदारी एल ॲन्ड टी कंपनीकडे आहे. कंपनीने दखल घेत रस्त्यावरून वाहत असलेले पाणी थांबविले आहे. त्यामुळे पाण्याची नासाडी काही प्रमाणात थांबली आहे.

लक्ष्मीटेकडी येथील प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या सुमारे ९ लाख लिटर पाण्याचा पुनर्वापर होण्याची गरज आहे. या पाण्याचा पुनर्वापर होण्यासाठीच ‘रिसायकलिंग टॅंक’ बांधण्यात आले आहे. प्रकल्पाची देखभाल जोवर पाणीपुरवठा मंडळाकडून होत होती, तोवर ‘रिसायकलींग टॅंक’ वापरात होता. पाण्याची बचत होत होती, त्यातील पाणी पुन्हा वापरले जात होते.

टँकचा उद्देशच सफल नाही

जुलै २०२१ मध्ये शहर पाणीपुरवठ्यासह प्रकल्पाची जबाबदारी कंपनीला दिली. प्रारंभी काही महिने कंपनीकडून ‘रिसायकलिंग टॅंक’चा वापर सुरू होता. पण, गेल्या आठवडाभरापासून टॅंकमधील पाणी पुन्हा बाहेर सोडले जात आहे. त्यामुळे ज्या उद्देशाने टॅंक बांधण्यात आला आहे, तो उद्देश सफल झाला नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

Web Title: Belgaum Water Passing Through Purification Wasted

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top