सांगली जिल्ह्यातील बेंजो, बॅंडवाले निघाले शेतमजुरीला

अजित झळके
Wednesday, 22 July 2020

जिल्ह्यातील पाच हजाराहून अधिक बेंजो आणि बॅंडवाले सध्या शेतमजुरीला निघाले आहेत.

सांगली : जिल्ह्यातील पाच हजाराहून अधिक बेंजो आणि बॅंडवाले सध्या शेतमजुरीला निघाले आहेत. उसात भांगलण करणे, नवीन ऊस लागवड करणे, डाळींब बागा चाचरणे, खत घालणे आदी कामांवर त्यांची चूल पेटत आहे. कोरोना संकटाने त्यांचा व्यवसाय मोडून टाकला आहे. सोबत संसारही मोडायला आलाय. हे किती काळ चालणार माहित नाही. 

त्यामुळे या मंडळींनी स्वतःतील कलाकाराला मारून टाकलेय, उरलाय तो फक्त शेतमजूर, जो जगण्यासाठी संघर्ष करतोय. खानापूर तालुका, वाळवा तालुक्‍यातील किल्लेमच्छिंद्रगड, कवठेमहांकाळ तालुक्‍यातील काही गावे आणि सीमा भागातील सांगोला तालुका म्हणजे बॅंडवाल्यांची खाण. किमान पाच हजाराहून अधिक लोकांचे पोट या व्यवसायावर चालते. त्यात वाजवणारे आले, गाणारे आले, वाहन चालक आले आणि काही जणांना जगवावे लागते ते पोंगेदेखील आले. त्यात महिला, युवक, मुलेही आहेत. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, निवडणूक निकाल, लग्न समारंभ हे यांचे हक्काचे हंगाम. कोरोनाने या साऱ्यांची टाळेबंदी करून टाकली आहे. 

"अनलॉक' सुरु होताना या समारंभ, उत्सवांवर अनिश्‍चित काळासाठी बंदी घालण्यात आली आहे. इथे गर्दी चालणार नाही, वाजंत्री तर नाहीच नाही. त्यामुळे तमाशा, ऑर्केस्ट्राचे फड बंद पडले, तशीच वेळ बेंजो, बॅंड कलाकारांवर आली आहे. या लोकांना वर्षातून किमान 70 ते 80 दिवस काम असते. इतर वेळेला सराव असतो किंवा आराम. काहींचा कुटुंब कबेला मोठा, ते वेळ पडेल तसे शेतमजूरी करतात. आता ती वेळ साऱ्यांवर आली आहे. 

कोरोनाचे संकट अनिश्‍चित काळासाठी डोक्‍यावर बसले आहे. या स्थितीतून बाहेर पडून पुन्हा समारंभ, उत्सव सुरु होणार कधी, हे कुणालाच माहिती नाही. हक्काचा गणेशोत्सव, नवरात्रोत्सव हातातून जाणार हे नक्की झाले आहे. अशावेळी शेतमजुरी करणे एवढेच त्यांच्या हातात आहे. त्याचा परिणाम म्हणून अनेक बॅंड मालकांनी आपली वाहने विकायला काढली आहे. कलाकार वाहून नेण्यासाठी या मालकांनी नवीन वाहने बॅंकेचे कर्ज घेऊन विकत घेतली होती. ती आता थांबून राहिल्याने हप्ते भरणे शक्‍य नाही. त्यामुळे हे संकट आल्याचे बॅंड मालक सुभाष जाधव यांनी सांगितले. 

बेंजो, बॅंड कलाकारांना कधीच कुणी वाली नव्हता आणि नाही. आमच्या हालापेष्टा आम्ही सहन करतोय. कलाकार मानधन योजनेत आमच्यातील तीन लोक आहेत. इतरांना मानधन सुरु करायला हवे, मात्र दखल कुणी घेत नाही. आम्ही लग्नात वाजवतो, गणपती उत्सवात वाजवतो, बांधावर बसून सराव करतो म्हणून आम्ही कमी दर्जाचे कलाकार ठरतो काय ? जगण्याची धडपड करतोय सगळे.
- सुभाष जाधव, बॅंड मालक, किल्लेमच्छिंद्रगड 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Benjo, Bandwale from Sangli district went to farm labor