सावधान... घरात घुसताहेत चेन स्नॅचर...

प्रवीण जाधव
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

दिवसाबरोबर रात्रीच्या घरफोडीच्या घटना वाढत असताना "चेन स्नॅचिंग'च्या घटनांचेही वाढते प्रमाण, चिंताजनक आहे. रस्त्यावर पाठीमागून येऊन महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावले जात आहेत. त्याचबरोबर दोन घटनांमध्ये पाणी पिण्याच्या तसेच अन्य बहाण्याने घरात शिरून दागिने हिसकावण्याचे प्रकार घडले आहेत, ही बाब गंभीर आहे.

 सातारा : शहर परिसरात गेल्या काही वर्षांपासून थांबलेल्या "चेन स्नॅचिंग'च्या प्रकारांनी पुन्हा डोके वर काढले आहे. रस्त्यावर होणारे "चेन स्नॅचिंग' आता अगदी घरा-घरांपर्यंत पोचले आहे. त्यावर पोलिसांचे नियंत्रण राहिलेले दिसत नाही. त्यामुळे पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी याबाबत तातडीने उपाययोजना करण्याचा सूर उमटू लागला आहे. 

महिलांनी दागिने घालून बाहेर पडूच नये, अशी परिस्थिती पाच वर्षांपूर्वी सातारा शहर तसेच जिल्ह्याच्या परिसरात निर्माण झाली होती.

दर दोन दिवसांनी कोणत्या ना कोणत्या ठिकाणी मंगळसूत्र किंवा सोनसाखळी हिसकावण्याचे प्रकार घडतच होते. अनेकदा या घटनांमध्ये महिला जखमीही झाल्या. या प्रकारांची गांभीर्याने दखल घेत तत्कालीन पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी उपाययोजना राबविण्यास सुरवात केली. त्यामुळे अशा घटनांना काही प्रमाणात आळा बसला होता. परंतु, गुन्हे घडायचे काही थांबलेले नव्हते. 

पाेलिस पेट्राेलिंगची गरज

देशमुख यांच्यानंतर पदभार स्विकारलेल्या पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्या कार्यकाळात अशा गुन्ह्यांनी डोके वर काढले होते. त्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील "चेन स्नॅचिंग'च्या घटनांना प्रतिबंध बसावा, यासाठी विविध उपाययोजना राबविण्यास सुरवात केली होती. त्यामध्ये बिट मार्शल व हायवे पेट्रोलिंगला जास्त प्राधान्य दिले होते. पीसीआर गाड्यांचे पेट्रोलिंगही सुरू करण्यात आले. शहरामध्ये या पेट्रोलिंगचा चांगला परिणाम जाणवत होता. काही मिनिटांनी शहरातील प्रत्येक भागात पोलिसांचे अस्तित्व जाणवत होते. त्याचा परिणाम "चेन स्नॅचिंग'बरोबर चोरीच्या घटनांवर आळा बसण्यावरही झाला. महामार्गावर होणारी "रॉबरी'ही थांबली गेली. 

आता मात्र गेल्या काही महिन्यांपासून ही घडी काहिशी विस्कटलेली दिसते आहे. दिवसाबरोबर रात्रीच्या घरफोडीच्या घटना वाढत असताना "चेन स्नॅचिंग'च्या घटनांचेही वाढते प्रमाण, चिंताजनक आहे. रस्त्यावर पाठीमागून येऊन महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावले जात आहेत. त्याचबरोबर दोन घटनांमध्ये पाणी पिण्याच्या तसेच अन्य बहाण्याने घरात शिरून दागिने हिसकावण्याचे प्रकार घडले आहेत, ही बाब गंभीर आहे. रस्त्यावरच काय घरामध्येही महिला सुरक्षित राहिलेल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस दलाला पुन्हा "चार्ज' व्हावे लागणार आहे. 

कोरेगावात वृद्ध महिला टार्गेट 

कोरेगाव शहर आणि आसपासच्या गावांमध्ये गेल्या दहा ते 12 दिवसांत "चेन स्नॅचिंग' चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. चोरटे दुचाकीवर फिरत असून, शक्‍यतो ते वयोवृद्ध महिलांना "टार्गेट' करत आहेत. महिलांना गोड बोलून दूधवाल्याचा मुलगा आहे. माझ्या आईला तुमच्यासारखेच दागिने करावयाचे आहेत. जरा तुमचे दागिने दाखवा, असे सांगून फसवत आहेत. हे चोरटे 25 ते 30 वयोगटातील असून, दिसायला सुशिक्षित असल्यासारखे वाटतात. त्यामुळे फसवणूक होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beware ... Chain Snatcher entering the house ...