सांगली : ‘वांझ’ तूर बियाण्यांपासून सावधान!

कृषी विभागाचा इशारा; गतवर्षीच्या नुकसानीनंतर जागृती मोहीम
tur seed
tur seedSakal

सांगली - गतवर्षी सदोष तूर बियाण्यांमुळे जिल्ह्यात हजारो एकरांवरील पिकाला फटका बसला होता. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर कृषीसंशोधकांनी सर्व्हे करून जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाला अहवाल दिला होता. कृषी विद्यापीठांतर्फे त्यावर अभ्यासांती तुरीवरील वांझ रोगाचे निदान झाले होते. गतवर्षी ‘सकाळ’ने या समस्येकडे कृषी विभागाचे लक्ष वेधले होते. या पार्श्‍वभूमीवर या वर्षी लागवडीच्या हंगामाच्या सुरुवातीलाच कृषी विभागाने शेतकऱ्यांना आवश्‍यक त्या उपाययोजांबाबत अवगत करीत सावधानतेचा इशारा दिला आहे.

गेल्यावर्षी जत तालुक्यातील हजारो एकरांतील तुरीबाबत वाईट अनुभव आला होता. पन्नास ते सत्तर टक्के पिकाचे योग्य वाढ होऊनही त्यांना फुले व शेंगाच आल्या नव्हत्या. शेतकऱ्यांनी बाजारातील सुधारित बियाणे खरेदी केल्यानंतर हा प्रकार घडला होता. सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांनी वाट पाहून शेवटी सारे पीकच उपडून टाकले होते. हा प्रकार येरळा प्रोजेक्ट सोसायटीने राहुरी कृषी विद्यापीठातील निवृत्त कृषी संशोधक डॉ. बी. पी. पाटील, तूरतज्ज्ञ डॉ. बाळकृष्ण जमदग्नी यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यांनी या भागात दौरे करून पाहणी केली. एकूण ११० एकर क्षेत्रातील नमुने घेतले. त्यापैकी जवळपास शंभर एकर क्षेत्रातील पीक शंभर टक्के वाया गेले होते. त्यांनी कृषी विभागाकडे याबाबत रितसर तक्रार करून याची कारणमिमांसा करावी, अशी विनंती केली होती. कसबे डिग्रज कृषी संशोधन केंद्र तसेच राज्यातील कृषी संशोधकांनी याबाबत अभ्यास करून वांझ रोगाचे निदान केले होते.

वर्षभरापूर्वीच्या अभ्यासानंतर या वर्षी हा धोका टाळण्यासाठी कृषी विभागाने या वर्षी शेतकऱ्यांना या रोगाबाबत जागृत करताना उपाययोजना सूचवल्या आहेत. हा वांझ रोग विषाणूजन्य असून ‘एरियोफाईड माईट’ या कोळ्याद्वारे पसरतो. हा विषाणू १३ तासांपर्यंत कोळ्याच्या शरीरात जिवंत राहतो. एका झाडावर एक कोळी असेल, तर प्रसारणाची क्षमता ५३ टक्के असते. पाच कोळी असतील तर १०० टक्के प्रसारणाची क्षमता असते. यानिमित्ताने थेट बांधावरच्या समस्या जाणून घेत, त्यावर वेळेत उपाययोजना सूचवण्यासाठी शासन यंत्रणा पुढाकार घेत असल्याचा एक सुखद अनुभव यानिमित्ताने आला आहे.

रोगाची लक्षणे

  • पानावर गोलाकार फिकट पिवळे ठिबके; तसेच कोवळ्या पानावर पिवळसर हिरवट चट्टे दिसतात.

  • पाने व फांद्या लहान राहतात व रोपांची वाढ खुंटते. पानांचा आकार लहान व वेडावाकडा होतो.

  • पूर्णतः अथवा अंशतः फुलधारणा होत नाही, शेंगाची संख्या घटते

  • झाडे शेवटपर्यंत हिरवी राहून झुडपासारखी दिसतात. रोगग्रस्त झाडे भुरी रोगास बळी पडतात.

बियाणे आणि प्रक्रिया

कृषी विभागाने रोग प्रतिकारक कृषी विभागाने ‘विपुला बीडीएन ७११’, ‘बीडीएन ७१६’, ‘बीएसएमआर-८५३’, ‘बीडीएन१३-४१’(गोदावरी) या बियाण्‍यांची शिफारस केली आहे. त्यावर एरियोफाईड कोळ्याच्या प्रादुर्भाव वाढू नये यासाठी कोळी नाशकाची प्रती १० लिटर पाण्यात २० मिली ‘डायकोफॉल’ १८.५ टक्के किंवा पाण्यात मिसळणारे गंधक ८० टक्के डब्‍ल्‍यूपी २० ग्रॅम किंवा फेनाझॅक्विन १० टक्के मिली औषधाची १० ते १५ दिवसाच्या अंतराने दुसरी फवारणी करावी अशी सूचना केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com