नातवासाठी मासे पकडायला गेलेल्या भाटशिरगावच्या दाम्पत्याचा बुडून मृत्यू

शिवाजी चौगुले
Thursday, 18 February 2021

नातवासाठी मासे पकडायला गेलेल्या भाटशिरगाव (ता.शिराळा) येथील दाम्पत्याचा पाझर तलावात बुडून मृत्यू झाला.

शिराळा (जि. सांगली) : नातवासाठी मासे पकडायला गेलेल्या भाटशिरगाव (ता.शिराळा) येथील दाम्पत्याचा पाझर तलावात बुडून मृत्यू झाला. अर्जुन लक्ष्मण देसाई (वय 53) व सौ. सुमन अर्जुन देसाई(46) अशी त्यांची नावे आहेत. ही घटना बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाटशिरगाव गावाजवळ शिराळा-सागाव या मुख्य रस्त्यालागत पाझर तलाव आहे. त्या ठिकाणी अर्जुन देसाई वस्ती व शेती आहे. मुलगा दीपक हा ट्रॅक्‍टरवर चालक म्हणून कामाला असल्याने चिखली येथे होता. अर्जुन यांनी दुपारी मक्‍याला पाणी लावले होते. त्यावेळी लाईट गेल्याने व नातू मासे मागत असल्याने अर्जुन आपल्या पत्नी व नातवासह तलावात मासेमारी करण्यासाठी गेले होते.

सुमन एका काठावर तर अर्जुन दुसऱ्या काठावर बसले होते. दरम्यान सुमन यांचा तोल गेल्याने त्या तलावात पडल्या. त्यांना वाचवण्यासाठी अर्जुन पोहत त्यांच्याकडे गेले असता सुमन यांनी त्यांना मिठी मारल्याने दोघांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना तलाव जवळ खेळत असणाऱ्या पाच वर्षांच्या नातू साकेत याने पहिली. पळत जाऊन त्याने आईला आजी आजोबा पाण्यात बुडल्याचे सांगितले. त्यानंतर नातेवाईकांना माहिती दिली. नातेवाईकांसह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.

सहायक पोलिस निरीक्षक विशाल पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.त्यावेळी तालावाच्या काठावर मोबाईल, व सुमन यांचे चप्पल आढळून आले. अर्जुन यांचा बटवा पाण्यात तरंगत होता.दुपारी कांदे येथील गोसावी समाज्याच्या लोकांनी पाण्यात मृतदेहाचा शोध घेतला पण आढळून आले नाहीत शेवटी चिलारी व दगड याच्या साह्याने रणजित देसाई, पिंटू अस्वले,शहाजी देसाई, सर्जेराव घोलप यांनी एकमेकांना मिठी मारलेले मृतदेह बाहेर काढले.

त्यावेळी नातेवाईकांना केलेला आक्रोश हृदय पिटाळून टाकणारा होता. ते या पूर्वी ही अधून मधून मासे मारी करत होते.पण आज ची त्यांची मासेमारी त्यांच्या आयुष्यातील शेवटची ठरली. त्यांच्या पश्‍च्यात मुलगा, विवाहित मुलगी ,सून, नातवंडे असा परिवार आहे. पुढील तपास पोलीस हवालदार एस.एस.नलवडे करत आहेत. 

आरत्या होत्या तोंडपाठ 
सर्व देवांच्या आरत्या तोंडपाठ अर्जुन यांच्या सर्व देवांच्या आरत्या तोंड पाठ होत्या. दसऱ्याच्या नवरात्रोत्सवात अर्जुन नऊ दिवस सकाळ संध्याकाळ सर्व आरत्या करत असल्याच्या त्यांच्या आठवणी जाग्या झाल्या. 

संपादन :  युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhatshirgaon couple drowned while fishing for grandchildren