भाऊसाहेब ऍडमिट आहेत...! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

बुधवारी (ता. 27) डॉ. राजेंद्र पवार, विलास शेंडे यांच्यासह नागरिक कार्यालयाबाहेर थांबले होते. तलाठी भाऊसाहेबांची ते वाट पाहत होते. मात्र, तलाठी ऍडमिट असल्याचा फलक वाचल्यानंतर नागरिकांना मोठा मनस्ताप झाला.

नगर : नागापूरचे तलाठी कार्यालय गेल्या दोन आठवड्यांपासून बंद आहे. तलाठी भाऊसाहेब कधी येणार? आज तरी येणार का? असे प्रश्‍न नागरीक रोजच करतात. कार्यालयाच्या दरवाजावरच, तलाठी भाऊसाहेब ऍडमिट असल्याचा फलक लावला आहे. बुधवार (ता. 27) ते एक डिसेंबरपर्यंत कार्यालय बंद राहणार, असा मजकूर त्यावर आहे. 

पर्यायी व्यवस्था नाही 
एमआयडीसीजवळ असलेल्या तलाठी कार्यालयातून नागापूर, नवनागापूर, बोल्हेगावकरिता कारभार चालतो. दोन आठवड्यांपासून कार्यालय बंद असल्याने सर्वसामान्यांची महत्त्वाची शासकीय कामे अडकून पडली आहे. खरे तर महसूल विभागाने पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे असताना, कार्यालय बंद ठेवले आहे. 

दरवाजावर ऍडमिटचा फलक 
बुधवारी (ता. 27) डॉ. राजेंद्र पवार, विलास शेंडे यांच्यासह नागरिक कार्यालयाबाहेर थांबले होते. तलाठी भाऊसाहेबांची ते वाट पाहत होते. मात्र, तलाठी ऍडमिट असल्याचा फलक वाचल्यानंतर नागरिकांना मोठा मनस्ताप झाला. डॉ. पवार यांनी तातडीने जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले. 

कार्यालय बंद 
त्यात म्हटले आहे, की तलाठी भाऊसाहेब रीतसर रजा घेऊन ऍडमिट झाले असतील, तर त्यांच्या जागी अन्य कर्मचारी नेमून सर्वसामान्यांची कामे करणे गरजेचे होते. मात्र, तसे घडत नाही. याबाबत सुरवातीला पीकनुकसानीच्या कामानिमित्त कार्यालय बंद राहिल्याचा फलक होता. त्यानंतर तलाठी भाऊसाहेब ऍडमिट असल्याचा फलक झळकत होता. 

पर्यायी व्यवस्था करावी 
सध्या शेती, गहाणखत, सात-बारा उतारा, जमिनीवर वारस नोंद, विद्यार्थ्यांना लागणारे उत्पन्नाचे दाखले आदी महत्त्वाच्या कामांमुळे नागरिकांची हेळसांड होत आहे. आर्थिक झळ बसते, कामे होत नाहीत, याला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित करीत, प्रशासनाने तातडीने पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. 

वरिष्ठांचे दुर्लक्ष 
जिल्हा मुख्यालयाच्या जवळ असणाऱ्या तलाठी कार्यालयात असा सावळा गोंधळ असले तर, दुर्गम भागात काय परिस्थिती असेल, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष घालण्याची गरज आहे. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhausaheb hospitalised