महाराष्ट्र एकिकरण समितीबाबत भीमाशंकर पाटील यांचे 'हे' वादग्रस्त विधान

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 डिसेंबर 2019

मराठी भाषिकांवरील अन्याय, अत्याचाराचा संदर्भ देत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात बेळगावसह सीमाभाग पाकिस्तानमध्ये आहे का? असा सवाल केला होता.

बेळगाव - भाषावार प्रांतरचनेवेळी कर्नाटकात अडकलेल्या सीमाभागातील मराठी भाषिक आणि हा लढा तेवत ठेवणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समिती नेत्यांना महाराष्ट्र - कर्नाटक सीमेवर उभे करून गोळ्या घाला, असे वादग्रस्त विधान कर्नाटक नवनिर्माण सेनेचे स्वयंघोषित अध्यक्ष भीमाशंकर पाटील यांनी केले आहे.

मराठी भाषिकांवरील अन्याय, अत्याचाराचा संदर्भ देत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात बेळगावसह सीमाभाग पाकिस्तानमध्ये आहे का? असा सवाल केला होता. त्यानंतर आज लगेच एका कन्नड संघटनेच्या नेत्याने मराठी भाषिकांना थेट गोळ्या घालून हत्या करण्याची भाषा केली आहे. त्यामुळे याचे सीमाभागात संतप्त पडसाद उमटले. वक्तव्याचा निषेध नोंदविला जात आहे. 

भीमाशंकर यांनी का केली मागणी ?

राष्ट्रीय नागरिक नोंदणी व नागरिकत्व सुधारणा कायद्याला मंजूरी देण्यात आल्यानंतर देशात संतप्त पडसाद उमटले. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न उपस्थित झाला. खासगी, सार्वजनिक मालमत्तेची हानी झाल्याच्या घटना वाढल्या. त्यामुळे केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी यांनी सार्वजनिक मालमत्ता व त्यात रेल्वेचे नुकसान करणाऱ्यांची गोळ्या घालून हत्या करण्याची मागणी केली. त्याला विविध संघटनांनी निषेध नोंदवला. पण, हाच संदर्भ देत पत्रकार परिषदेत भीमाशंकर यांनी ज्या पध्दतीने अंगडी यांनी रेल्वेबाबत भुमिका घेतली. त्यापध्दतीने सीमाप्रश्‍नाबाबत धाडस दाखवतील का? सीमाप्रश्‍न साठ वर्षे भिजत पडला आहे. या कालावधीत येथील मराठी भाषिक आणि महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकर्त्यांनी कर्नाटकाची सार्वजनिक मालमत्तेची हानी केली. काट्याप्रमाणे विषय रुततो आहे. त्यासाठी कायम स्वरुपी तोडगा म्हणून मराठी भाषिक आणि म. ए. समितीच्या नेत्यांना महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर गोळ्या घालून विषय संपविण्याची वादग्रस्त मागणी केली. याचे सीमाभागात पडसाद उमटले. निषेध नोंदविला जात असून, भीमाशंकरच्या विरोधामध्ये कारवाई करण्याची मागणी जोर धरली आहे. 

व्होट बँकेसाठी मराठी भाषिकांना कुरवाळणे थांबवा

मराठी भाषिकांनी कर्नाटकाच्या स्वाभिमानाला धक्का सतत पोचविला आहे. त्यांना गोळ्या घाला, असे म्हणण्याचे धाडस दाखवा. मराठी भाषिकांना सीमेवर उभे करून तेथे गोळ्या घाला. त्याला आमचा पाठिंबा असेल. त्याचे काय परिणाम होतील, ते होऊ दे. सीमाप्रश्‍न एकदा संपविला जावा. व्होट बॅंकसाठी मराठी भाषिकांना कुरवाळणे थांबवा, अशी अजब मागणी करण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhimashankar Patil Comment On Maharashtra Ekikaran Samiti