
इस्लामपूर : नगरपालिका प्रशासनाने बिलांचे सुरू केलेले वाटप थांबवून दिलेली बिले मागे घ्यावीत. प्रलंबित असलेली अपिले, त्यावरील सुनावणी तात्काळ घेऊन मगच नवीन बिलाची आकारणी करावी;
इस्लामपूर : नगरपालिका प्रशासनाने बिलांचे सुरू केलेले वाटप थांबवून दिलेली बिले मागे घ्यावीत. प्रलंबित असलेली अपिले, त्यावरील सुनावणी तात्काळ घेऊन मगच नवीन बिलाची आकारणी करावी; अन्यथा राष्ट्रवादी कॉंग्रेस याविरोधात आंदोलन उभे करेल, असा खणखणीत इशारा आज राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. बिलाबाबतीत नागरिकांवर भुर्दंड बसत असताना सत्ताधारी गप्प का आहेत ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
माजी नगराध्यक्ष ऍड. चिमन डांगे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष व नगरसेवक शहाजी पाटील, खंडेराव जाधव, विश्वनाथ डांगे यांनी सध्या वाटप सुरू असलेल्या घरपट्टी बिलांना विरोध असल्याचे सांगत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
ऍड. डांगे म्हणाले,""प्रशासनाच्या चुकीचा भुर्दंड नागरिकांना सोसावा लागत आहे. सत्ताधारी विकास आघाडी गप्प आहे, याचा अर्थ त्यांना वाढीव घरपट्टी मान्य आहे. मागील वर्षी आकारण्यात आलेल्या घरपट्टी बिलांच्यावरील अपिलांची अद्याप सुनावणी नाही, निर्णय नाही. पन्नास टक्क्यांहून अधिक नागरिकांना कोरोना संसर्गामुळे अपिलांची संधीही मिळालेली नाही. असे असताना मागील अर्धवट प्रक्रिया पूर्ण करण्यापूर्वी इस्लामपूर पालिका प्रशासनाने नवीन बिले दिलीच कशी? जोपर्यंत 50 टक्के सवलतीचा निर्णय होत नाही, तोवर विरोध राहील. ही बिले मागे घेऊन निर्णय झाल्यानंतरच सुधारित बिले द्यावीत.'' शहाजी पाटील म्हणाले,""नागरिकांवर अव्वाच्या सव्वा आकारणी होत असताना नगराध्यक्ष गप्प कसे राहू शकतात?''
विश्वनाथ डांगे म्हणाले,""मागील वर्षी ज्यांना अपीलाची संधी मिळाली नाही, त्यांना प्राधान्याने अपिलाची संधी देणे आवश्यक होते. महत्त्वाचा टप्पा अपील समिती निर्णयाचा आहे. नंतर यावर्षीच्या घरपट्टी आकारणीचा विषय येतो. प्रशासनाने पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले असते तर नागरिकांवर हे संकट आले नसते. अजूनही वेळ गेलेली नाही. ही बिले मागे घ्यावीत.''
खंडेराव जाधव म्हणाले,""ज्यांनी अपिले केलीत. त्यांनाही बिलांत थकीत असा उल्लेख करून आकारणी झाली आहे. हा अन्याय आहे.''
निर्णय होईपर्यंत पाठपुरावा
मंत्री जयंत पाटील यांनी प्रभागनिहाय नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. वाढीव घरपट्टीवरून नागरिकांत प्रचंड असंतोष असल्याचे पुढे आले आहे. राष्ट्रवादी जनतेच्या हितासाठी रस्त्यावर उतरेल. सकारात्मक निर्णय होईपर्यंत पाठपुरावा करेल, असे डांगे यांनी स्पष्ट केले.
किती टक्क्यांची ही वाढ
डांगे यांनी एका नागरिकाच्या बिलाचे उदाहरण दिले. ते म्हणाले,""एकाला 2019 साली 1052 रुपये घरपट्टी आली. ती यावेळी 200 टक्के वाढून 2983 इतकी आली. एका व्यावसायिकाला गतवर्षी 1200 रुपये कर होता. यावर्षी 6200 रुपयांचे बिल आले. महादेवनगरमधील एकाला 20 हजार बिल होते. तेच बिल आता 76 हजार इतके वाढून आले.
संपादन : प्रफुल्ल सुतार