मिरज जवळील बेडगजवळ कोट्यवधीचे गुटखा साहित्य जप्त...

प्रमोद जेरे
Wednesday, 22 July 2020

सांगली, मिरज शहरात गुटखा तस्करांचे एक मोठे रॅकेट अद्यापही सक्रिय असल्याचे गिल यांच्या  कारवाईमुळे स्पष्ट झाले आहे.

मिरज - कर्नाटकातून महाराष्ट्रात अवैध मार्गाने येणाऱ्या   गुटखा बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याचा मोठा काळाबाजार पुन्हा एकदा उघड झाला आहे. शहरापासून जवळच असलेल्या बेडग येथे पोलीस उपाधीक्षक संदीप सिंह गिल यांनी मंगळवारी (ता 21) रोजी एक 16 चाकी मालमोटार पकडून त्यामधून  किमान सव्वा ते दीड कोटी रुपयाचे गुटका आणि त्यासाठीचे साहित्य जप्त करण्यात आले. कंटेनर चालकास ताब्यात घेतले आहे. या गाडीची या कंटेनरच्या मागे पुढे असलेली खाजगी वाहने मात्र यावेळी पसार झाली.

सांगली, मिरज शहरात गुटखा तस्करांचे एक मोठे रॅकेट अद्यापही सक्रिय असल्याचे गिल यांच्या  कारवाईमुळे स्पष्ट झाले आहे. कर्नाटकातून एक 16 चाकी कंटेनर क्रमांक (आरजे 14 जी.के.3898) हा बेडगमार्गे मिरजला येत असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक संदीप सिंह गिल यांना मिळाली. त्यांनी तातडीने बेडग गावानजीक कर्नाटकातून येणाऱ्या रस्त्यावर यासाठी सापळा रचला आणि हा कंटेनर अडवून त्याची तपासणी केली असता त्यामध्ये सुगंधी तंबाखू आणि गुटखा साठी लागणारे साहित्य मिळून आले.

वाचा - सुप्रसिद्ध पैलवान सादिक पंजाबी यांचे दुःखद निधन...

या गाडीच्या पुढे काही अंतरावर आणि मागे काही अंतरावर असलेली दोन छोटी वाहने कारवाई झाल्याचे पाहून पळून गेली. या वाहनांचा ही तपास सुरु असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान या कारवाईमुळे सांगली, मिरज शहरातील गुटखा तस्करीचे पितळ उघडे पडले आहे. शहरात गल्लीबोळातील पान टपर्‍यांवर मिळणारा गुटका आणि माव्यासाठीची सुगंधी तंबाखू याकडे अन्न प्रशासन आणि स्थानिक पोलिसांचे असलेले दुर्लक्ष याचाही पंचनामा या कारवाईच्या निमित्ताने होणार आहे. गिल यांच्या या कारवाईमुळे शहरातील गुटका तस्कर आणि चोरून गुटखा विकणाऱ्या टपरी वाल्यांची मात्र भंबेरी उडाली आहे.

संपादन - मतीन शेख


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Billions of gutka items seized near Bedag near Miraj