सांगली जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूबाबत सतर्कता 

विष्णू मोहिते 
Friday, 8 January 2021

एव्हिएन इन्फ्लूएन्झा (बर्ड फ्ल्यू) हा विषाणूजन्य रोग आहे. हा प्रामुख्याने कोंबड्या, कावळे, वन्य व इतर पक्षी तसेच स्थलांतरित पक्षी यांना होणारा विषाणूजन्य आजार आहे.

सांगली : एव्हिएन इन्फ्लूएन्झा (बर्ड फ्ल्यू) हा विषाणूजन्य रोग आहे. हा प्रामुख्याने कोंबड्या, कावळे, वन्य व इतर पक्षी तसेच स्थलांतरित पक्षी यांना होणारा विषाणूजन्य आजार आहे.

देशातील राजस्थान, मध्यप्रदेश आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये कावळे, वन्य पक्षी व स्थलांतरित पक्षी यांच्यामध्ये एव्हिएन इन्फ्लूएन्झा (बर्ड फ्ल्यू) या रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्याबाबत विविध प्रसिद्धी माध्यमातून निदर्शनास आलेले आहे. त्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागामार्फत सतर्कता बाळगत विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एस. ए. धकाते यांनी दिली. 

जिल्ह्यातील पाळीव पक्ष्यांवर तसेच जलाशयांवर स्थलांतरित होणाऱ्या पक्ष्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. यासाठी स्थानिक पक्षिप्रेमी, संस्था, अभ्यासकांच्या माध्यमातून या पक्ष्यांवर नजर ठेवण्यात येत आहे. कुक्कुट पक्षी, वन्य पक्षी, स्थलांतरित पक्षी यांच्यात एव्हिएन इन्फ्लूएन्झा (बर्ड फ्ल्यू) ची लक्षणे दिसल्यास अथवा जास्त प्रमाणात मृत्यू झाल्यास याबाबत वरिष्ठ कार्यालयास तत्काळ माहिती देऊन रोग अन्वेषण विभाग या संस्थेशी संपर्क साधावा, अशा सूचना पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. 

यावर्षीच्या एव्हिएन इन्फ्लूएन्झा (बर्ड फ्ल्यू) सर्वेक्षण कार्यक्रमानुसार कलोअकल नमुने, ट्रकिअल नमुने व रक्त जल नमुने संकलित करून रोग अन्वेषण प्रयोगशाळेत पाठविण्यासंदर्भात क्षेत्रीय पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर दक्षता पथक स्थापन्यासाठी नियोजन करण्यात येत असल्याचे डॉ. धकाते यांनी सांगितले. 

हे लक्षणे दिसतात... 
चानक मरतूक होते. पक्ष्यांची भूक मंदावते. पक्ष्यांचे डोके, पापण्या, तुरे व कल्ले, पाय यांच्यामध्ये सूज दिसून येते. नाकातून स्राव वाहतो. तुरा, कल्ला यांचा रंग जांभळट झाल्याचे दिसून येते. पक्ष्यांमध्ये खोकणे, शिंकणे तसेच हागवण लागणे अशा प्रकारची लक्षणे आढळून येतात. 

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bird flu alert in Sangli district