बर्ल्ड फ्लूबाबत दक्षता : कोंबड्यांचे 299 नमुने तपासणीला

अजित झळके
Tuesday, 12 January 2021

देशातील काही भागात बर्ड फ्लूने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. या पार्श्‍वभूमीवर सांगली जिल्ह्यात कोंबड्यांचे 299 नमुने तपासणीसाठी पुणे आणि भोपाळ येथील रोग अन्वेषण विभागाकडे पाठवले आहेत.

सांगली ः देशातील काही भागात बर्ड फ्लूने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. कोंबड्यांत या रोगाची लागण झाल्याची माहिती पुढे आली आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. कोंबड्यांचे 299 नमुने तपासणीसाठी पुणे आणि भोपाळ येथील रोग अन्वेषण विभागाकडे पाठवले आहेत. त्याचा अहवाल मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. किरण पराग यांनी सांगितले.

कोरोना संकटातून बाहेर पडतोय, असे वाटत असताना बर्ड फ्लूने डोके वर काढले आहे. जिल्ह्यात अद्याप त्याची लागण कुठेही झालेली नसली तरी काहीसी परिणाम आता व्यवसायावर जाणवू लागला आहे. तो जाणवू नये आणि लोकांना सुरक्षित चिकन, अंडी मिळावेत, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्याबाबत संपूर्ण दक्षता घेतली जात आहे. त्याबाबत पशुसंवर्धन आयुक्तांनी पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांसह डॉक्‍टरांशी संवाद साधला. त्यांनी कुकुटपालन करणाऱ्यांशी चर्चा केली. 

जिल्ह्यातील खानापूर, मिरज आणि कवठेमहांकाळ या तीन तालुक्‍यात पोल्ट्री शेडची संख्या मोठी आहे. तेथील 299 नमुने पुणे आणि भोपाळ येथील रोग अन्वेषण विभागाकडे पाठवण्यात आले आहेत. त्याचा अहवाल मिळण्याची प्रतिक्षा आहे. 

जिल्ह्यात गेल्या दहा वर्षात पोल्ट्री व्यवसाय प्रचंड वाढला आहे. परसातील कुकुटपालन सुमारे 8 ते 10 लाखांवर आहे. व्यावसायिक पद्धतीने होणाऱ्या कुकुटपालनात पक्षांची संख्या सुमारे 15 लाखांवर आहे. त्यात वाढ झाल्याचा अंदाज आहे. त्याचा नवा सर्वे सुरु आहे. पोल्ट्री विषयी माहिती घेणे सुरु केले आहे, असे डॉ. पराग यांनी सांगितले. 

ते म्हणाले,""पशुसंवर्धन आयुक्तांशी चर्चा झाली आहे. पशुधन विकास अधिकाऱ्यांशी संवाद साधला आहे. डॉक्‍टरांना प्रशिक्षण दिले आहे. सर्व काळजी घेतली जात आहे. बाहेरून पक्षी आणायला बंदी आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत. बाहेरून येणारे पक्षी, बदक आदींमुळेही चिंता वाटते आहे. त्यावरही लक्ष ठेवले आहे.'' 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bird flu vigilance: 299 samples of hens send to teste