esakal | सेनेच्या हक्काच्या मतदारसंघांत भाजपचे उमेदवार तयार 
sakal

बोलून बातमी शोधा

सेनेच्या हक्काच्या मतदारसंघांत भाजपचे उमेदवार तयार 

सातारा जिल्ह्यात मतदारसंघांवरून युतीत पडणार ठिणगी  ?

सेनेच्या हक्काच्या मतदारसंघांत भाजपचे उमेदवार तयार 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : जागा वाटपाच्या तिढ्यात अडकलेल्या भाजप, शिवसेनेत मतदारसंघांवरून वादाची ठिणगी पडणार आहे. शिवसेनेने दावा सांगितलेल्या मतदारसंघात भाजपने तोडीसतोड उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांत अस्वस्थता पसरली आहे. ऐन वेळी युती तुटल्यास शिवसेनेला नवख्या आणि आयात उमेदवारांच्या जिवावर जिल्ह्यात विधानसभेची लढाई लढावी लागणार आहे. 

मागील वेळी सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. त्या वेळी शिवसेनेने कोरेगाव, वाई, पाटण, फलटण, कऱ्हाड उत्तर आणि माण या सहा मतदारसंघांतून उमेदवार दिले होते. त्याच मतदारसंघांवर शिवसेनेचा यावेळेसही दावा आहे. त्यासाठी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही परिस्थितीत सेनेच्या वाट्याचे मतदारसंघ न सोडण्याची भूमिका घेतली आहे. त्यानुसार जिल्ह्यात शिवसेनेने बांधणी सुरू ठेवली आहे; पण युतीतील मित्र पक्षाच्या बांधणीकडे दुर्लक्ष करीत भारतीय जनता पक्षाने मात्र, शिवसेनेच्या वाट्यातील मतदारसंघांत धडाधड उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामध्ये कऱ्हाड उत्तरमधून मनोज घोरपडे, कऱ्हाड दक्षिणेतून अतुल भोसले, कोरेगावातून महेश शिंदे, वाईतून मदन भोसले यांचा समावेश आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या सर्वांना कामाला लागण्याचे आदेशही दिले आहेत, तर दुसरीकडे माणमधून जयकुमार गोरेंचा पक्ष प्रवेश घेऊन त्यांना भाजपने तिकीट देण्याची तयारी केलेली आहे. येथे शिवसेनेने शेखर गोरेंचा प्रवेश घेऊन तेच उमेदवार असतील असे जाहीर केले आहे. त्यामुळे येथे एका गोरेंची अडचण होणार आहे. एकूणच शिवसेनेच्या वाट्याच्या मतदारसंघांत भाजपने आपले उमेदवार जाहीर करून आघाडी घेतली आहे. त्यामुळे ऐन विधानसभेच्या तोंडावरच सातारा जिल्ह्यात सेना- भाजपच्या नेत्यांत वादाची ठिणगी पडणार आहे. दोन्ही बाजूंकडून कोणीही मागे घेण्यास तयार नाहीत, तसेच शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आपल्या मतदारसंघात नवीन, तरुण, तसेच निष्ठावंत उमेदवारांना संधी देण्याची सूचना केली आहे. या सर्व परिस्थितीत शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत. त्यांच्यातील संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न उपनेते व कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष नितीन बानुगडे- पाटील यांनी केला आहे; पण भाजप- शिवसेनेचा अट्टाहास किती गांभीर्याने घेणार हे ही महत्त्वाचे आहे. लोकसभेचा पॅटर्न विधानसभा निवडणुकीत राबविला गेल्यास भाजपमध्ये उमेदवारीच्या अपेक्षाने गेलेल्यांना पुन्हा शिवसेनेत यावे लागेल. हे इतके सोपे नाही. त्यामुळे आता शिवसेना व भाजपमध्ये मतदारसंघांवरून वादाची ठिणगी पेटण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 


दोन्ही राजे चालतील.... 

जिल्ह्यातील दिग्गज नेते भाजप व शिवसेनेच्या वाटेवर आहेत. काहींनी प्रवेश केला आहे. आता खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशासोबत ते शिवसेनेच्याही संपर्कात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळेच त्यांनी काल जो पक्ष लोकहिताचे "प्रपोजल' देईल, त्या पक्षाचा प्रवेशासाठी विचार करू, असे सूचक विधान केले आहे. यासोबतच विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांचीही शिवसेनेसोबत चर्चा झाली आहे; पण त्यातून मार्ग निघालेला नाही. त्यांचे सभापतिपद शाबूत राहावे, यासाठी ते भाजप किंवा शिवसेना असा पर्याय स्वीकारणार आहेत; पण त्यांचे विरोधक त्यांच्या आधीच भाजपमध्ये गेल्याने त्यांच्यापुढे शिवसेनेचा पर्याय राहिला आहे. जिल्ह्यातील शिवसेनेचे काही पदाधिकारी रामराजे किंवा उदयनराजे दोघांचेही स्वागतच आहे, अशी भूमिका घेऊ लागले आहेत. 

loading image
go to top