esakal | Loksabha 2019: डॉ. सुजय विखे यांचं नगर दक्षिणच्या मतदारांना खुलं पत्र
sakal

बोलून बातमी शोधा

Loksabha 2019: डॉ. सुजय विखे यांचं नगर दक्षिणच्या मतदारांना खुलं पत्र

- सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे संग्राम जगताप यांच्यात येथे थेट लढत
- ही लढत राज्यातील सर्वाधिक महत्त्वाच्या लढतींपैकी एक
- शरद पवार आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची
- भाजपचे उमेदवार सुजय विखे यांचे मतदारांच्या नावे खुलं पत्र लिहिलं

Loksabha 2019: डॉ. सुजय विखे यांचं नगर दक्षिणच्या मतदारांना खुलं पत्र

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नगर: नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात प्रचाराला चांगलीच गती आली असून भारतीय जनता पक्षाचे डॉ. सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे संग्राम जगताप यांच्यात येथे थेट लढत होत आहे. ही लढत राज्यातील सर्वाधिक महत्त्वाच्या लढतींपैकी एक मानली जात आहे कारण ही निवडणूक राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिष्ठेची केली आहे. दोन्ही उमेदवारांकडून वेगवेगळ्या पद्धतीने प्रचार केला जात आहे. भाजपचे उमेदवार सुजय विखे यांनी प्रचाराची नवी कल्पना शोधली असून त्यांनी मतदारांच्या नावे खुलं पत्र लिहिलं आहे. 

सुजय विखे यांनी मतदारांना लिहिलेले पत्र जसेच्या तसे…

सन्मा.मतदार बंधु आणि भगिनींनो….
सस्नेह नमस्कार…

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील निवडणूक (ता. 23) एप्रिल रोजी संपन्न होत आहे. आज नरेंद्र मोदीच्या रुपाने देशाला सक्षम आणि दुरदृष्टीचे नेतृत्व लाभले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली या मतदार संघाच्या विकासाला निश्चित दिशा मिळेल असा मला विश्वास वाटतो. माझ्या या उमेदवारीला शिवसेना, आरपीआय, रासप आणि शिवसंग्राम या मित्र पक्षांनी पाठींबा दिला आहे. त्यामुळेच या निवडणूकीत पुढे जाण्याची मला प्रेरणा मिळाली. देशपातळीवर ही निवडणूक एका महत्त्वाच्या निर्णायक टप्प्यावर असून, तसेच अहमदनगर दक्षिण मतदार संघातील निवडणुकीकडे सुध्दा राज्य आणि देश पातळीवरील सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामागील घडामोडी आपण माध्यमातून ऐकल्या, पाहिल्या आहेतच, यानिमित्ताने आपल्याशी काही बोलायचे आहे.

पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील 1915 नंतर प्रवरा परिसरात फिरत असत. त्यावेळी शेतकऱ्यांची दूरावस्था पाहुन ते व्यथित होत असत. त्यातूनच त्यांच्या सामाजिक कार्याची सुरुवात झाली. पुढील इतिहास आपणास ज्ञात आहेच. त्यांनी वंचित शोषित अशा छोट्या शेतकऱ्यांना एकत्र करून, त्यांना सहकाराची दिक्षा देऊन ग्रामीण भारतामध्ये मोठे परिवर्तन घडविले. ‘एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ या वचनानुसार प्रवरा परिसरातील सहकारी, औद्योगिक क्रांती पुढे देशभर पसरत गेली. ती इतकी विशेष गोष्ट होती की, या क्रांतिकार्याला पाहण्यासाठी सन 1962 साली स्वतःपंडित नेहरू प्रवरानगरला आले, त्यावेळी या प्रयोगाचे त्यांनी कौतुक केले. ती एक अहिंसक क्रांती होती.

याच सहकार तत्त्वाला अधिकाधिक व्यापक आणि विस्तारित रूप देण्याचा माझ्या आजोबांनी प्रयत्न केला. सहकारी कारखानदारीच्या जोडीला शिक्षण, आरोग्य, कृषी, जलसिंचन, महिला, बेरोजगार, आदिवासी अशा समाजातील सर्वच वंचित आणि शोषित घटकांच्या जीवनामध्ये परिवर्तन व्हावे यासाठी ते जीवनभर कृतिशील राहिले. त्यांच्या प्रयत्नांना अनेकांनी विरोध केला परंतु ते कायम सामान्य माणसाचे दुःख समजून घेत राहिले. तोच वारसा माझ्या वडिलांनीही कायम चालविला. त्या कार्याला त्यांनी आधुनिकतेची जोड दिली. मी नम्रपणे नमुद करतो की, याच मार्गदर्शनावरून मी सामाजिक कार्यात मार्गक्रमण करीत आहे.

सहकार हा विखे-पाटील कुटुंबाचा प्राण आहे, तेच आमचे जीवन ध्येय आहे. तुम्ही जाणताच की 1950 पासून प्रवरा कारखाना अविरत उत्तम रित्या चालू आहे. आमच्या शेजारीच राहुरी आणि गणेशनगर हे कारखाने बंद पडलेले होते. त्यामुळे त्यावर अवलंबून असलेले शेतकरी, कामगार आणि समाजातील इतर घटक बेरोजगार झाले होते, ही परिस्थिती पाहून मी अस्वस्थ होत होतो. म्हणूनच मी शर्थीचे प्रयत्न करून हे दोन्हीही कारखाने यशस्वीरित्या चालू केले. त्यामुळे सामान्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद किती मोठा असतो याचा मी अनुभव घेतला. काही लोक सहकारी चळवळीला बदनाम करण्यासाठी सक्रिय झालेले आहेत, एकेकाळी भांडवलशाहीच्या शोषणा विरोधात विठ्ठलराव विखे-पाटील यांनी सहकाराचा मंत्रोच्चार केला. 70 वर्षांनंतर पुन्हा भांडवलशाहीचेच समर्थन केले जात असेल तर समाजाला विरोधक कुठे नेत आहोत हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

पद्मश्री विखे-पाटील यांनी शिक्षणाचे महत्त्व जाणले होते त्यासाठी 1964 झाली प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेची स्थापना करून महाराष्ट्रातील पहिल्या प्रवरा पब्लिक स्कूलची स्थापना केली. ग्रामीण भागात शिक्षणाच्या क्रांतीची ती सुरुवात होती, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेला प्रवरा कारखान्याच्या सभासदांच्या पेमेंटमधून संस्थेच्या इमारती बांधकामासाठी मोलाचे सहकार्य केले. याच अनूषंगाने पद्मश्रींनी अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या जडणघडणीत अध्यक्ष या नात्याने मोलाचे योगदान दिले. प्रवरा ग्रामीण संस्थेतून शिक्षण घेऊन आज देशविदेशातील 700 शहरांमध्ये 1 लाखांपेक्षा अधिक माजी विद्यार्थी विविध क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करीत आहेत. त्याच बरोबर त्यांनी प्रामुख्याने आरोग्य सेवेकडेही लक्ष दिले आणि प्रवरा मेडिकलची स्थापना करून गरिबातल्या गरिबाला ही उत्तम आरोग्य सेवा आज मिळत आहेत. गेल्या 3 ते 4 वर्षापासून विखे-पाटील फौंडेशनच्या वतीने मी दक्षिण भागात अनेक आरोग्य शिबिरे घेतली. सहकाराच्या शिक्षणाचा आणि आरोग्य सेवेचा वसा विखे-पाटील कुटुंब अत्यंत आत्मीयतेने चालवीत आहे. याच जोडीला पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील 1962 पासून सार्वजनिक जीवनात होते. 1971 पासून त्यांनी संसदेत प्रतिनिधित्व केले. त्यांच्या प्रयत्नातून नगर शहराच्या वैभवात भर घालणारी ऐतिहासीक अशी न्यायालयाची आरटीओची इमारत उभी राहीली. के.के.रेंज मध्ये जाणा-या शेतक-यांच्या जमीनी वाचविल्या. पिंपळगाव जोगा धरणाच्या कामासह कालव्यांना गती दिली.

शेतक-यांचे कोणते मुलभूत प्रश्‍न आहेत ते सतत समजून घेत राहिले. यासाठी कधीही केवळ शासनच सर्व करील याची त्यांनी वाट पाहिली नाही. 1991 साली महाराष्ट्र पाणी परिषदेची स्थापना केली आणि त्यांसाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र डोळ्यासमोर ठेऊन पाण्याचे कसे नियोजन झाले पाहिजे, या विषयी प्रत्येक सरकारला आपली भूमिका आग्रहाने सांगितली. आ.गणपतराव देशमुख आणि इतर मान्यवरांच्या सहकार्याने जलसिंचनासंदर्भात त्यांनी जागृती घडविली. अहमदनगर आणि मराठवाडा यांच्यातील पाणी संघर्ष कुणाच्यातरी राजकारणासाठी उपयोगी असेल, परंतु समाजाला परवडणारे नाही म्हणून त्यांनी कधीही असा प्रादेशिक आणि संकुचित विचार केला नाही. त्यासाठी मार्ग सुचविले, ते व्यवहार्य कसे आहेत ते समजावून सांगितले. पश्चिमेकडील वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे वळविण्यासाठी प्रयत्न गेल्या 25 वर्षापूर्वीच झाले असते, तर आजची स्थिती निर्माणच झाली नसती. केवळ विखे पाटील परिवाराला त्याचे श्रेय मिळेल आणि आपली राजकीय दुकानदारी धोक्यात येईल या भीतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे असलेल्या जलसंपदा विभागाने त्यासाठी जाणीवपूर्वक अनुकूल निर्णय घेतले नाहीत. ते झाले असते तर पारनेर, श्रीगोंदा, पाथर्डी, जामखेड, नगर तालुक्यातील जनतेला हे दु:ख भोगण्याची वेळ आली नसती. हे मी आपणास सांगण्याची गरज नाही.

या प्रश्नासंदर्भातही माझ्या आजोबांची राजकीय कोंडी करण्याचा सातत्याने प्रयत्न केला. परंतु त्यांनी कधीही सामान्यांची बाजू सोडली नाही. सामान्य माणसांच्या बळावर त्यांनी नेहमीच येणा-या आव्हानांवर मात केली. त्यांसाठी त्यांना त्याची राजकीय किंमतही चुकवावी लागली. पण ते कधीही आपल्या भूमिकेपासून ढळले नाहीत.

माझे वडील ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनीही याच मार्गावरुन आपली राजकीय वाटचाल केली आहे. ते सरकारमध्ये असतानाही आणि नसतानाही त्यांनी नेहमीच कृषि, जलसिंचन, शिक्षण, आरोग्य, सामाजिक सुरक्षा या विषयांना प्राधान्य दिले. त्यांच्याकडे कृषि विभागाची धुरा असताना बांधावर खते पुरविण्यापासून ते शेतीतील आधुनिकीकरण अशा अनेक मुद्यांवर त्यांनी कितीतरी क्रांतीकारी निर्णय घेतले. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून माझ्या मातोश्री सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी ग्रामीण भागाच्या विकासासाठी लोकाभिमुख निर्णय घेतले. विखे पाटील कुटुंबाने सामाजिक जीवनात संकुचित भूमिका घेवून कधीच काम केले नाही. नगर दक्षिण आणि उत्तर असाही कधी विचार केला नाही. हा विचार सहकार या तत्वात कधीच बसणारा नाही. राजकारण करणा-यांची ही विभाजनवादी प्रवृत्ती विखे पाटील कुटुंबावर विनाकारण आरोप करीत आहे. समाजाचा आणि विखे पाटील कुटुंबाचा ऋणानुबंध गेल्या 100 वर्षांचा आहे, तो आत्मीयतेने एकमेकांशी जोडलेला आहे.

मला हा सारा वैचारिक वारसा मिळालेला आहे. ज्यामध्ये सहकाराचे तत्व, सामाजिक जाणीव, सहानूभाव, मानवीयता, बंधुभाव आहे. विखे पाटील कुटुंब सतत सामान्य माणसांसाठी असताना मी या भूमिकेपासून दूर कसा राहू शकतो? माझ्यातही याच विचारांचा वारसा आहे. म्हणुनच मी सार्वजनिक जीवनात गेल्या काही वर्षांपासून सक्रिय झालो. समाजात फिरत राहिलो, त्यांचे प्रश्न समजून घेतले, दु:खही जाणले. त्यामुळे या सगळ्यांवर काही उपाय करायचा असेल तर आपल्यालाही राजकारणात सक्रिय झाले पाहिजे असे मला वाटू लागले. माझ्या आजोबांनी समाज कारणातून राजकारण केले, तेच तत्व मी आंगीकारले आहे .प्रथम समाज त्यानंतर राजकारण हे लक्षात न घेता माझी भूमिका जाणीवपूर्वक दुर्लक्षित करुन, कुठल्यातरी पुर्वग्रह दुषित भावनेने विरोधक आमच्या परिवारावर बिनबुडाचे आरोप करीत आहेत याची मला खंत वाटते.

विद्यमान निवडणुक सामाजिक ज्वलंत प्रश्नांवर व्हायला हवी, याऐवजी आमच्या घरातील वैचारिक मतभेदांचाही विरोधक आपल्या राजकारणासाठी सोयीने वापर करीत आहेत. मी त्याचा प्रतिवाद करणार नाही, परंतु आदरणीय पवार साहेबांनीही आपल्या राजकीय लाभासाठी याचा वापर करावा हे आपल्याला तरी योग्य वाटते का? याचा आपणही जरुर विचार करावा.

‘निवडणूक’ हा लोकशाही व्यवस्थेचा कणा आहे. त्या व्यापक, सामाजिक प्रश्नांवर आणि विकासाभिमूख दृष्टिकोनावर लढल्या जायला हव्यात. त्यातही खासदार निवडण्याची प्रक्रिया ही देश समोर ठेवून व्हायला हवी. ही राजकीय परिपक्वता आदरणीय नेत्यांकडून तरी दाखवली जाईल, ही सामान्य माणसाची अपेक्षा होती. परंतु दुर्दैवाने ते घडतांना दिसत नाही. निवडणूकीत मतदार सघातील प्रलंबीत प्रश्न, शेती, शेतकरी यांच्या अडचणी, महिला, बेरोजगार यांचे प्रश्न, उद्योजक व कामगार वर्गााचे प्रश्न यावर चर्चा व्हावयास हवी होती तथाप‍ि व्यक्तिव्देषातून आणि आकसातून, बिनबुडाचे आरोप केले जाताहेत, हे माझ्यासारख्या राजकारणात नव्याने येवू पाहणा-या तरुण कार्यकर्त्याला दु:खदायक आहे.

मात्र मी माझ्या उदात्त वारशापासून कधीही ढळणार नाही. मी या परंपरांचा पाईक होण्याचा कसोशिने प्रयत्न करीत राहीन. कोणतीही संकुचित भूमिका घेवून, प्रादेशिक आणि विभाजनवादी भूमिका घेणार नाही. बागायती शेतक-यांच्या प्रश्नांबरोबरच प्रामुख्याने जिरायती भागाच्या पाणी प्रश्नांसाठी माझ्या आजोबांनी जे प्रयत्न केले तेच अधिक नेटाने पुढे नेण्याचा सतत प्रयत्न करीन. डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी पाणी प्रश्नासाठी सतत संघर्ष केला, तो पुढे नेला तरच जिरायती भागासाठी चांगले दिवस येणार आहेत. ते जर तिथेच सोडले तर त्यांच्या 50 वर्षांचे प्रयत्न वाया जातील. त्याहीपेक्षा लोकांच्या जीवनातील अंधार कायम राहील हे आपल्याला परवाडणारे आहे का? त्यासाठी कृष्णा खो-याच्या अंतर्गत येणारा कुकडी,घोड,सिना प्रकल्प,अथवा पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेकडे वळविण्याचा विषय पुढे नेणे मला अधिक महत्वाचे वाटते, जिल्ह्याच्या हक्काचे पाणी मिळविण्यासाठी मी कटीबध्द आहे.

गेली अनेक वर्षे विकासाच्या दुरदृष्टीचा अभाव असलेल्या आणि केवळ धाक, दडपशाही आणि दहशतीचा विचार डोळ्यासमोर असलेल्या प्रवृत्तींमुळे नगर शहरासह ग्रामीण भागाचा विकासही खुंटला. रोजगाराची कोणतीही साधनं नव्याने निर्माण केली गेली नाहीत, असलेले उद्योग या भागातून निघून गेले, औद्योगिक क्षेत्रात निर्माण केले गेलेले हे अशांततेचे वातावरण विकासाला मारक ठरले. ही परिस्थिती आपल्याला बदलावी लागेल. विकासाचा नवा विचार घेवून, या भागातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी आणि भयमुक्त वातावरण निर्माण करुन, सामाजिक बंधुभाव निर्माण करण्यासाठी मी बांधिल राहील असे आपणास वचन देतो. त्यासाठी आपल्या समस्या लोकसभेत मांडण्याची मला संधी द्यावी, ही नम्र विनंती करतो.

ज्ञानयुक्त, आरोग्य युक्त आणि भयमुक्त समाज निर्मितीसाठी आपले अनमोल मत द्या…

आपला नम्र
डॉ. सुजय राधाकृष्ण विखे पाटील

loading image
go to top