भाजप एक्‍स्प्रेस, काँग्रेस सुपर, राष्ट्रवादी प्लॅटफॉर्मवरच

प्रदीप कुलकर्णी - सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

जत - स्वतंत्र लढण्याच्या निर्णयानंतर भाजपची एक्‍स्प्रेस सुसाट धावत आहे. तिला ब्रेक लावण्यासाठी काँग्रेसच्या सुपरने वेग घेतला आहे. डबे जोडण्याच्या प्रतीक्षेत असणारी राष्ट्रवादी अजून प्लॅटफॉर्मवरच आहे. तिसऱ्या आघाडीशी न जमल्याने गाडीला दुरुस्तीची प्रतीक्षा आहे. शिवसेना, रासप, रिपाइं व इतर घटक कोणत्या डब्यात जागा मिळते, याची वाट पाहत आहेत. यामुळे तालुक्‍यात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे.

जत - स्वतंत्र लढण्याच्या निर्णयानंतर भाजपची एक्‍स्प्रेस सुसाट धावत आहे. तिला ब्रेक लावण्यासाठी काँग्रेसच्या सुपरने वेग घेतला आहे. डबे जोडण्याच्या प्रतीक्षेत असणारी राष्ट्रवादी अजून प्लॅटफॉर्मवरच आहे. तिसऱ्या आघाडीशी न जमल्याने गाडीला दुरुस्तीची प्रतीक्षा आहे. शिवसेना, रासप, रिपाइं व इतर घटक कोणत्या डब्यात जागा मिळते, याची वाट पाहत आहेत. यामुळे तालुक्‍यात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे.

निवडणुकीचा अंदाज घेऊन आमदार विलासराव जगताप यांनी चार महिन्यांपासून तयारी केली. पहिल्या बैठकीत महायुतीतील घटक पक्ष गैरहजर राहिल्याने त्याक्षणी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेऊन त्यांनी कार्यकर्त्यांना रिचार्ज केले. प्रत्येक गट, गणात बैठका घेऊन तयारी सुरू केली आहे. सद्यःस्थितीत भाजप एक्‍स्प्रेस सुसाट धावत आहे. श्री. जगताप यांनी प्रत्येक गटाचा चार वेळा दौरा केला. कार्यकर्त्यांच्या बैठका, मेळावा घेऊन निवडणुकीची रंगत आणली. कार्यकर्त्यांची ऊर्जा वाढवण्यावर भर दिला. तिकोंडी गणात मुलगा मनोज जगताप यांना रिंगणात उतरवले जाणार असल्याने दरीबडची गटात त्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. या गटात बारीक लक्ष ठेवले आहे. डफळापूर, बनाळी व उमदी वगळता अन्य गटातील उमेदवार निश्‍चित केल्याने उमेदवार तयारीला लागलेत. डफळापूर व बनाळी तिढा त्यांची डोकेदुखी ठरणार आहे. तो सोडवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

भाजपच्या एक्‍स्प्रेसला ब्रेक लावण्यासाठी काँग्रेसच्या सुपरनेही वेग पकडला आहे. विक्रम सावंत काँग्रेसमध्ये नेहमी होणारी गटबाजी मोडीत काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. भाजपातील नाराजांना आपल्या डब्यात घेताना स्वकियांचा रुसवाही ते काढत आहेत. त्यांनी संपूर्ण तालुक्‍याचाही दौरा पूर्ण केला. इच्छुकांची संख्याही जास्त असल्याने उमेदवारी देताना त्यांना कसरत करावी लागणार आहे. उमदी, मुचंडी व संख गटात राष्ट्रवादी, जनसुराज्यशी जुळवून घेण्याचा प्रयत्न काँग्रेस करीत आहे. मात्र, काँग्रेसचे नेते सुरेश शिंदे यांनी फारकत घेतल्याने त्याचा फटका बसू नये, याची दक्षता श्री. सावंत यांना घ्यावी लागणार आहे.

बालेकिल्ला म्हणून ओळख असणाऱ्या राष्ट्रवादीची अवस्था दयनीय आहे. आमदार जगताप यांनी साथ सोडल्यानंतर राष्ट्रवादीच्या नौकेत बसायला कोणीही तयार नाही. जिल्ह्यातील महत्त्वाची पदे देऊन नौका तरंगत ठेवण्याचे काम आमदार जयंत पाटील यांनी केले. पदाचा उपभोग घेण्यात धन्यता मानणाऱ्यांनी पक्ष बळकटीसाठी एकही पाऊल उचलले नाही. त्यामुळे राष्ट्रवादी बॅकफूटवर गेली. सुसाट भाजपने त्यांच्याकडे पाहिलंही नाही. काँग्रेसच्या इंजिनला डबा जोडण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. इतर घटकपक्ष बरोबर येतात का? या चाचपणीत त्यांची गाडी अजूनही प्लॅटफॉर्मवरच आहे.
जनसुराज्यचे बसवराज पाटील व वसंतदादा आघाडीचे नेते सुरेश शिंदे यांची आमदार जगताप व विक्रम सावंत यांच्याशी बैठक झाली. मात्र, युतीवर तोडगा न निघाल्याने राष्ट्रवादी व इतर घटक पक्षांना घेऊन तिसरी आघाडी मैदानात उतरवण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. सुरेश शिंदे यांच्या तळ्यात यांची भूमिका, बसवराज पाटील यांचा काँग्रेसशी जुळवून घेण्याचा प्रयत्न, यामुळे इतर पक्षांची अडचण झाली. त्यामुळे तिसऱ्या आघाडीची घडी अजून बसलेली नाही.

लढतींचे चित्र दोन दिवसांत स्पष्ट
रासप, शिवसेना व स्वाभिमानीचा प्रभाव कमी असला तरी महत्त्वाच्या मतांचा पॉकेट त्यांच्याकडे आहे. ते स्वतंत्र लढण्याची भूमिका बोलावून दाखवत असले तरी कोणत्या गाडीच्या डब्यात जागा मिळते का? याची प्रतीक्षा लागून राहिली आहे, जेणे करून झेडपीचा प्लॅटफॉर्म गाठता येईल. एकूणच तालुक्‍यात झेडपीचे वातावरण चांगलेच तापले आहे. दोन दिवसांत लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

Web Title: bjp congress ncp politics