भाजप आम्हांला प्रचारात सहभागी करून घेत नाही : मित्रपक्षांची भावना

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

सन्मानाने बोलावून प्रचारात सहभागी करून घेणे गरजेचे आहे. दोन दिवसांत निर्णय न झाल्यास आम्ही आमची भूमिका घेणार आहोत.
 

सातारा : विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने झालेल्या महाआघाडी आणि महायुतीसोबत असलेल्या मित्रपक्षांना चांगले दिवस येतील, अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांना कोणीही विश्‍वासात घेऊन आपल्यात सामावून घेईना झाले आहे. रिपब्लिकन पक्ष, रयत क्रांती संघटनेसह इतर मित्रपक्षांनी सध्या तरी तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्याचे चित्र आहे. मित्रपक्षांशी जुळवून न घेतल्यास युतीच्या उमेदवारांची अडचण होण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मात्र आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारात तर बळिराजा शेतकरी संघटनेने भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. 

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय पक्ष मिळेल त्यांना सोबत घेऊन महाआघाडी, महायुती करून रिंगणात उतरले आहेत. पण, जागा वाटपात एखादा दुसरा मित्रपक्ष सोडला तर उर्वरित मित्रपक्षांना स्वतंत्र जागा दिलेल्या नाहीत. उलट मुख्य पक्षांच्याच चिन्हावर त्यांचे उमेदवार उभे करावे लागले आहेत. त्यामुळे रिपब्लिकन पक्षासह इतर मित्रपक्षांची चिन्हे निवडणुकीच्या रिंगणातून हद्दपार झाली आहेत. तरीही केवळ दिलेला शब्द पाळण्यासाठी हे मित्रपक्ष आघाडी व युतीसोबत राहिले आहेत. 

सातारा जिल्ह्यात मात्र, याचे नेमके उलटे चित्र पाहायला मिळत आहे. युतीचा मित्रपक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्षाला सुरवातीला फलटणची जागा सोडण्याचे आश्‍वासन भाजपने दिले होते. मात्र, ऐनवेळी ही जागा रयत क्रांती संघटनेला सोडली असे सांगितले. पण, युतीचा उमेदवार भाजपच्या कमळ चिन्हावर रिंगणात उतरविला आहे. त्यामुळे आहे ही राखीव जागाही भाजपकडेच राहिली आहे. यावरही शांत राहिलेले रिपब्लिकन पक्षाचे जिल्ह्यातील नेते व कार्यकर्ते यांना भाजपकडून प्रचारात सहभागी करून घेतलेले नाही. त्यामुळे हे सर्व कार्यकर्ते सध्यातरी तटस्थ आहेत. तशीच अवस्था रयत क्रांती संघटनेचीही झाली आहे. सातारा व कऱ्हाडमधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना भाजपकडून विश्‍वासात घेतलेले नाही. त्यामुळे त्यांनी अद्याप कोणाच्याही प्रचारात सहभाग घेतलेला नाही.
 
दुसरीकडे माजी खासदार राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना आघाडीसोबत आहे. त्यामुळे त्यांचे सर्व कार्यकर्ते आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारात सहभागी झाल्याचे सांगितले जात आहे. किसान मंच शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांचे हित राखणाऱ्या पक्षांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सध्यातरी त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते महाआघाडीसोबत दिसत आहेत. त्यांनीही आम्हाला विश्‍वासात घेतल्यासच प्रचारात सहभागी होऊ, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे सध्यातरी जिल्ह्यातील महाआघाडी व महायुतीचे मित्रपक्ष वाऱ्यावरच असल्याचे चित्र आहे. 

रिपब्लिकन पक्ष महायुतीसोबत असला तरी आम्हाला जिल्ह्यातील एकही जागा सोडली नाही. सध्या भाजपकडून आम्हाला प्रचारात सहभागी करून घेतलेले नाही. सन्मानाने बोलावून प्रचारात सहभागी करून घेणे गरजेचे आहे. दोन दिवसांत याबाबत निर्णय न झाल्यास आम्ही आमची भूमिका घेणार आहोत.

- अशोक गायकवाड, जिल्हाध्यक्ष, रिपब्लिकन पक्ष.
 

रयत क्रांती संघटना भारतीय जनता पक्षासोबत आहे. पण, जिल्ह्यात भाजपच्या उमेदवारांकडून अद्याप तरी आम्हाला विश्‍वासात घेतलेले नाही. त्यामुळे आम्ही कोणाच्या प्रचारात सहभाग घेतलेला नाही. येत्या एक ते दोन दिवसांत निर्णय न झाल्यास आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू. 

- शंकर शिंदे, सचिन नलवडे, रयत क्रांती संघटना. 

शाहू, फुले आंबेडकरांच्या विचारातून शेतकऱ्यांचे हित राखणाऱ्या पक्षांच्या पाठीशी राहण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे सध्या तरी आम्ही महाआघाडीसोबत आहोत. त्यांच्याकडून आम्हाला विश्‍वासात घेतल्यासच आम्ही प्रचारात सहभागी होऊ. 

- शंकर गोडसे, किसान मंच शेतकरी संघटना.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP does not get us involved in campaigning: feelings of allies