भाजपचा सामना काँग्रेस, राष्ट्रवादी की आघाडीशी?

- जयसिंग कुंभार
रविवार, 26 फेब्रुवारी 2017

राजकीय अवकाशात विरोधकाची एक स्पेस कायम असते. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भांडणात विरोधकाची ही स्पेस केवळ जिल्ह्यातच हरवली होती. आजवर दोन्ही काँग्रेसमधील भांडणे म्हणजे ‘ताटातले वाटीत अन्‌ वाटीतले...’ असा प्रकार होता. भाजपने खासदार आणि नंतर चार आमदारांचे बळ प्राप्त केल्यानंतर तो प्रकार संपला. खरे तर पंधरा वर्षांपूर्वीही काँग्रेसच्या विरोधात पाच अपक्ष जिल्ह्यात विजयी झाले होते. ते भाजप-युतीच्या सत्तेचे भागीदारही होते. त्यानंतर  जतमध्ये दोनदा कमळ फुलले. सांगली-मिरजेतही ते फुलले. मात्र, ते सारे काँग्रेस बंडखोरीची अपत्ये होती. आता मात्र चित्र बदलले आहे.

राजकीय अवकाशात विरोधकाची एक स्पेस कायम असते. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भांडणात विरोधकाची ही स्पेस केवळ जिल्ह्यातच हरवली होती. आजवर दोन्ही काँग्रेसमधील भांडणे म्हणजे ‘ताटातले वाटीत अन्‌ वाटीतले...’ असा प्रकार होता. भाजपने खासदार आणि नंतर चार आमदारांचे बळ प्राप्त केल्यानंतर तो प्रकार संपला. खरे तर पंधरा वर्षांपूर्वीही काँग्रेसच्या विरोधात पाच अपक्ष जिल्ह्यात विजयी झाले होते. ते भाजप-युतीच्या सत्तेचे भागीदारही होते. त्यानंतर  जतमध्ये दोनदा कमळ फुलले. सांगली-मिरजेतही ते फुलले. मात्र, ते सारे काँग्रेस बंडखोरीची अपत्ये होती. आता मात्र चित्र बदलले आहे. जिल्हा परिषदेतील विजयाने भाजपची यापुढची वाटचाल स्वबळावर सुरू झाली आहे. ही गोष्ट काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आजवरच्या पारंपरिक राजकारणाला छेद देणारी आहे.    
 

जिल्हा परिषदेत बहुमतासाठी तीन जागा हव्या आहेत आणि समोर विरोधकांची तोंडे तीन दिशांना आहेत. त्यामुळे भाजपसाठी सत्ता मिळवणे फार अवघड नाही. जिल्ह्यात भाजपचा खासदार आहे. चार आमदार आहेत. शिवाय शिवसेनेचाही आमदारही आहे. दोन तालुक्‍यांत शेतकरी संघटनेचा खासदारही आहे. 

थोडक्‍यात कधी काळी काँग्रेसची जिल्ह्यात जी स्थिती होती ती आज भाजपची आहे. म्हणजे भाजप आज सत्तेच्या शिखरावर आहे. शिखरावर जाण्याचा एक धोका असतो कारण तिथून उतार असतो. तिथे टिकून राहण्यासाठी खूप  मोठ्या संघर्षाची गरज असते. देशभरात काँग्रेसची वाताहत होत असतानाही राज्यातला विशेषतः पश्‍चिम महाराष्ट्रातला काँग्रेस (राष्ट्रवादीचा) पाया हलला नाही. तो मुळासकट उखडून पडण्यासाठी स्वातंत्र्यानंतरची ६७  वर्षे गेली. आता भाजपचीच काँग्रेस झाल्याने (वृत्तीसह) असा भेद करण्याला काही अर्थ आहे का ? असाही प्रश्‍न उपस्थित होऊ शकतो; मात्र उर्वरित महाराष्ट्राप्रमाणेच इथे भाजपने आता मुळापासून वाटचाल सुरू केली आहे. हे कुणालाही नाकारता येणार नाही.

राजकारणी तोच असतो जो वेळ पाहून आपल्या मान-आकांक्षांना मोडता घालून सत्तेची गणिते मांडतो. कधी काळी राज्यातील सत्तेच्या मांडीखाली ज्यांचे पोषण केले किंवा तोंडही वर काढू दिले नाही अशी अनेक मंडळी आता भाजपवासी होऊन आपले राजकीय भविष्य रंगवू लागली आहेत. त्यामुळे सत्तेच्या मांदियाळीत आणखी एक होऊ. त्यामुळेच जयंत पाटील यांनी काँग्रेसचा हातात घड्याळ बांधण्यासाठी खटाटोप केला होता. दोन्ही काँग्रेसपुढे काय वाढून ठेवले आहे त्याची जाणीव त्यांना होती; मात्र ही जयंतरावांची मदतीची हाक म्हणजे त्यांची हतबलता आहे आणि त्यांना धडा शिकवण्याची हीच संधी आहे, असा समज काँग्रेस नेतृत्वाचा झाला. मात्र, ही हतबलतेपेक्षा सावधानता होती हे काँग्रेसलाही निकालानंतर हाती लागलेल्या धुपाटण्यामुळे समजले असेल. 

जवळपास ३० टक्के मते भाजपला, २४ मते  राष्ट्रवादीला, तर स्वबळावर सत्तेत येण्याची स्वप्ने पाहणाऱ्या काँग्रेसला २२ टक्के मते मिळाली.  राष्ट्रवादीने शिराळा, कवठेमहांकाळमध्ये आघाडी केली तिथे त्यांनी भाजपचे पानिपत केले. तासगाव आणि वाळव्यात त्यांनी स्वबळावर सत्ता प्राप्त केली. पलूसमध्ये ते भाजपसोबत सत्तेत भागीदार असतील. जिल्हाभरातील संपूर्ण राष्ट्रवादी रिकामी करूनही पुन्हा जिल्ह्यात विरोधक म्हणून राष्ट्रवादीचेच अस्तित्व उरले आहे. आणि जयंत पाटील यांच्याकडे राष्ट्रवादीचे नेतृत्व आहे. यावेळी ‘नो जेजेपी.....ओन्ली बीजेपी’चा नारा खासदार संजय पाटील यांनी जिल्हा परिषद निवडणुकीआधी दिलाच होता. याचा अर्थच स्पष्ट होता की आता बीजेपीला गाडी फुल्ल  झाली, बाहेरून आणि आतूनही नेतृत्वासाठी जयंतरावांची गरज उरलेली नाही, असे त्यांना सांगायचे होते. जिल्हाभरात राष्ट्रवादीच्या पुनर्बांधणीसाठी जयंतरावांना आता भरपूर वेळ आहे आणि त्यासाठी त्यांची तयारीही आहे. जयंतरावांनी आत्तापर्यंत बाहेरून भाजपचे जिल्हाभरात पोषण केले. ते काँग्रेसला रोखण्यासाठी. ते आज ना उद्या भाजपमध्ये जातील असे आडाखे मांडले जायचे. भाजप स्वबळावर जात असताना आता दोन्ही काँग्रेसमधील पुढची वाटचाल आघाडीची की संघर्षाची यावरही जिल्ह्यातील यापुढचे निवडणुकांचे सामने रंगणार आहेत. आता पुढचे मैदान आगामी महापालिका निवडणुकांचे असेल.

Web Title: bjp fight congress, ncp, aghadi