गिरीशराव, पूराची पाहणी करताय का हौस भागवताय?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

गिरीश महाजन यांच्या या कृत्याचा विरोधकांकडून निषेध करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकार संवेदनशील नसल्याचे म्हटले आहे. महाजनांना असे करताना लाज कशी वाटत नाही, असे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

कोल्हापूर : पूरग्रस्त जिल्ह्याच्या पाहणी दौऱ्यावर असताना जलंसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी चक्क सेल्फीसाठी पोझ देत, हातवारे करत पूर पर्यटनाचा आनंद लुटल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठविली जात आहे. यासंबंधीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावरून व्हायरल होत असून अनेक नेटकऱ्यांनी महाजन यांच्यावर निशाणा साधला आहे. या व्हिडीओत गिरीश महाजन यांच्योसोबत काही कार्यकर्ते आणि पोलीसही या बोटीवर असल्याचे दिसून येत आहे. 

पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, सागंली या जिल्ह्यांत पूराने थैमान घातले असून लाखो लोकांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. पूरग्रस्तांची शासनातर्फे तसेच राज्यभरातून सर्व प्रकारची मदत पुरविण्यात येत असून अन्न आणि निवाऱ्याची सोय करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गुरुवारी कोल्हापूर जिल्ह्याला भेट देत, पूरस्थितीची हवाई पाहणी केली. या पाहणीनंतर त्यांनी तेथील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन बचत आणि मदतकार्य जोमाने सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. यावेळी, कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकात पाटील आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन हेही उपस्थित होते. मात्र, गिरीश महाजन यांच्या या पाहणी दौऱ्यातील व्हिडीओवरुन सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करण्यात येत आहे. पूरस्थितीची पाहणी करताय की पूर पर्यटन करताय? असा सवाल महाजन यांना नेटकऱ्यांनी विचारला आहे.

गिरीश महाजन यांच्या या कृत्याचा विरोधकांकडून निषेध करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकार संवेदनशील नसल्याचे म्हटले आहे. महाजनांना असे करताना लाज कशी वाटत नाही, असे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. तसेच पृथ्वीराज चव्हाण यांनीही महाजन यांच्यावर टीका करताना, ही वेळ स्टंटबाजी करण्याची नाही, हे तरी भान पाहिजे होतं, असं म्हटलं आहे. तर, शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनीही सरकार गंभीर नसल्याचे म्हटले. मदत केल्यानंतर बॅनरबाजी करत राजकारण केले जात असल्याची टीकाही शेट्टी यांनी यावेळी केली.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP leader Girish Mahajan smiling in a selfie video between kolhapur flood visit