देशात राहायचे असेल तर आमचे ऐका 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 4 January 2020

भाजप नेते सोमशेखर रेड्डींचे वादग्रस्त विधान : नागरिकत्व कायद्याला विरोध करणाऱ्यांना इशारा 

बंगळूर : "आमच्या देशात राहायचे असेल तर, आम्ही सांगितल्याप्रमाणे ऐकावे. अन्यथा परिस्थिती वेगळी होईल. हिंदूंना डिवचू नका. देशातून हाकलून देण्याची भीती असल्यास देश सोडून जा, असे वादग्रस्त विधान बळ्ळारीचे भाजप नेते सोमशेखर रेड्डी यांनी केले आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ शुक्रवारी (ता. 3) बळ्ळारी शहरात फेरी काढण्यात आली. या फेरीला संबोधित करताना त्यांनी वरील वादग्रस्त विधान केले. 

हे पण वाचा - ...तर मुख्यमंत्र्यांच्या चिंता वाढतील

श्री. रेड्डी म्हणाले, देशाच्या सुरक्षेसाठी नागरिकत्व कायदा अंमलात आणण्यात आला आहे. त्याला सर्वांनी पाठिंबा दिला पाहिजे. कायद्याच्या विरोधात बळ्ळारीत पुन्हा आंदोलन किंवा फेरी काढल्यास आपण गप्प बसणार नाही. आजच्या फेरीत केवळ पाच टक्के लोक आले आहेत. जास्त नाटक केल्यास उर्वरीत 95 टक्के लोकही रस्त्यावर उतरतील. त्यावेळी कायद्याला विरोध करणारे कुणीच शिल्लक राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. 

हे पण वाचा - खासदारांच्या समोरच महिलांनी घेतल्या नदीत उड्या, अन्... (video)

कोणीही आमच्या सहनशीलतेची परीक्षा पाहू नये. पोलिसांवर हल्ले केल्यास त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील. कॉंग्रेसचे नेते खोटे बोलून दंगे घडवत आहेत. पाकिस्तानात जायची इच्छा असलेल्यांनी तिथे खुशाल निघून जावे. देशात सर्वजण बंधूप्रमाणे आहोत. शत्रूप्रमाणे वागल्यास आमचे उग्र रुप दाखवावे लागेल. मी देशभक्त असून मेल्यानंतरही माझे प्रेत "भारतमाता की जय' म्हणेल. तुमच्यासारखे मी खोटे देशप्रेम दाखविणार नाही. आम्हाला फॅमिली प्लॅनिंग आणि तुम्हाला नाही का? आम्हीदेखील प्रत्येकजण 50 मुलांना जन्म देऊन जनसंख्या वाढवू, असे वादग्रस्त वक्‍तव्यही आमदार रेड्डी यांनी यावेळी केले. सोमेशेखर रेड्डी बळ्‌ळारीचे खाणसम्राट जी. जनार्दन रेड्डींचे बंधू आहेत. ते आधी बळ्‌ळारीचे आमदारही होते. तसेच कर्नाटक मिल्क फेडरेशनचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bjp Leader Somashekar Reddy Comments on Caa act