आमचं टार्गेट फक्त भाजप : लक्ष्मण माने

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडणूक लढविणार असून, 50 जागा लढविण्याचा आमचा विचार आहे. मात्र, जागावाटपानंतर किती जागा मिळतील हे कळेल.

सातारा : आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडणूक लढविणार असून, 50 जागा लढविण्याचा आमचा विचार आहे. मात्र, जागावाटपानंतर किती जागा मिळतील हे कळेल, असे वंचित बहुजन आघाडीचे बंडखोर नेते लक्ष्मण माने यांनी आज (मंगळवार) सांगितले. तसेच भाजपला पराभूत करणे हे आमचे मुख्य काम असून, ते आमचे टार्गेट आहे, असेही ते म्हणाले.

सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत लक्ष्मण माने बोलत होते. ते म्हणाले, भाजपला हरवण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलो आहोत. आता सगळ्या डाव्या पक्षांनीही एकत्र आले पाहिजे आणि हे देशावरचे संकट टाळलं पाहिजे. लोकसभेनंतर माझे आणि बाळासाहेबांचे मतभेद झाले. मला भाजपची ताकद वाढवण्यात कोणताही रस नाही. त्यामुळे मी बाळासाहेबांना सोडले. शरद पवार हे माझे मित्र आहेत हे मी कधीही नाकारले नाही.

माझे वैयक्तिक भांडण नाही

आमचे टार्गेट फक्त भाजप आहे. कोल्हापूर 2 सांगली 2 सातारा 1 पुणे 4 सोलापूर 2 या पश्चिम महाराष्ट्रातील जागा मागितल्या. उद्या बाळासाहेबांनी काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जुळवून घेतले तर माझे त्यांचे काही वैयक्तिक भांडण नाही, असेही ते म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP is our Target says Laxman Mane