भाजपची बाजार समितीसमोर जोरदार निदर्शने...महाविकास आघाडीच्या आदेशाची होळी 

घनश्‍याम नवाथे
Wednesday, 7 October 2020

सांगली- केंद्र सरकारची कृषी विधेयके लागू करण्यास राज्यातील महाविकास आघाडी सरकारने स्थगिती दिल्याच्या निषेधार्थ भाजपने आज कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर जोरदार निदर्शने केली. तसेच सरकारच्या आदेशाची होळी करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 

सांगली- केंद्र सरकारची कृषी विधेयके लागू करण्यास राज्यातील महाविकास आघाडी सरकारने स्थगिती दिल्याच्या निषेधार्थ भाजपने आज कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर जोरदार निदर्शने केली. तसेच सरकारच्या आदेशाची होळी करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 

केंद्रातील भाजप सरकारने संसदेच्या दोन्ही सभागृहात ऐतिहासिक कृषी विधेयक मंजूर केले आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडवणारे पाऊल उचलले आहे. या नविन कायद्यामुळे देशातील शेतकरी बंधमुक्त आणि दलालांच्या जोखडातून मुक्त होऊन कष्टाने पिकवलेल्या शेतीमालाची विक्री व बाजारपेठेचे स्वातंत्र्य मिळवतील. त्यांचा शेतीमाल कोठेही आणि योग्य हमीभावात विकण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एसएमपी कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नसल्याचे स्पष्ट सांगितले. कृषी सुधारणा विधेयकामुळे शेतकऱ्यांना स्वातंत्र्य प्राप्त होणार आहे. परंतू शेतकऱ्यांबद्दल बेगडी प्रेम दाखवणाऱ्या कॉंग्रेस आणि विरोधकांनी विधेयकाबद्दल अपप्रचार सुरू सुरू केला आहे. राज्यातील पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी विधेयकास स्थगिती दिली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्याविरोधात भाजपने आज आंदोलनाचा निर्णय घेतला. 

भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनात पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी बाजार समितीसमोर जोरदार घोषणाबाजी केली. महाविकास आघाडी सरकारचा निषेध केला. तसेच कृषी विधेयक लागू न करण्याबद्दल काढलेल्या आदेशाची होळी करण्यात आली. 
श्री. शिंदे म्हणाले, ""केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी विधेयके महत्वाची आहेत. त्याचे महत्व लक्षात घेऊन कॉंग्रेस सरकारने देखील ती आणण्याची यापूर्वी हमी दिली होती. विधेयकांचे कायद्यात रूपांतर झाले आहे. देशभरात तो लागू केला जात आहे. परंतू राज्यात तो लागू करू नये म्हणून आदेश काढला आहे. या आदेशाची आम्ही आज होळी करून निषेध व्यक्त केला आहे.'' 

नगरसेविका ऍड. स्वाती शिंदे, नगरसेविका गीतांजली ढेपे-पाटील, नगरसेवक पांडुरंग कोरे, युवामोर्चाचे दीपक माने, केदार खाडीलकर, अमर पडळकर, अशरफ वांकर, गजानन मोरे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP protests in front of market committee