माधव भंडारी म्हणाले, आम्ही खरी धर्मनिरपेक्षता पाळतो 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 30 September 2019

कोल्हापूर - आम्ही धर्मनिरपेक्षतेची चर्चा करत बसत नाही, तर आम्ही खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्षता पाळतो. जात, धर्म, भाषा प्रांत या आधारे काहीही न देता आम्हाला एकसंध भारत हवा आहे. त्यामुळे आम्ही धर्मनिरपेक्षतेचे ढोंग करत नाही, असे  भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी आज येथे स्पष्ट केले. कायद्यापुढे सर्व समान आहेत, असेही श्री. भंडारी म्हणाले.  

कोल्हापूर - आम्ही धर्मनिरपेक्षतेची चर्चा करत बसत नाही, तर आम्ही खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्षता पाळतो. जात, धर्म, भाषा प्रांत या आधारे काहीही न देता आम्हाला एकसंध भारत हवा आहे. त्यामुळे आम्ही धर्मनिरपेक्षतेचे ढोंग करत नाही, असे  भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी आज येथे स्पष्ट केले. कायद्यापुढे सर्व समान आहेत, असेही श्री. भंडारी म्हणाले.  

राजारामपुरीतील इंद्रप्रस्थ मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, विजय जाधव, ऍड. बाबा इंदुलकर आदी उपस्थित होते. 

श्री. भंडारी म्हणाले, केंद्र सरकारने 370 कलम रद्द करण्याचा निर्णय घेतल्यामुळे काश्‍मीरमधील विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. येथील बेरोजगारी संपायला मदत होणार आहे. केंद्र सरकारच्या दारिद्य्र निर्मूलनापासून ते रोजगार हमी योजनेपर्यंतच्या सर्व योजना येथील नागरिकांना मिळणार आहेत. 370 रद्द केल्याचे स्वागत काश्‍मीरमध्येही झाले असून जो विरोध आहे, तो केवळ सहा तालुके आणि तीन कुटुंबांपुरताच मर्यादित असल्याचे भंडारी यांनी स्पष्ट केले.

श्री. भंडारी म्हणाले, ""तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कृपेमुळे काश्‍मीरला वेगळा दर्जा मिळाला होता. एका देशात दोन पंतप्रधान, दोन घटना, दोन झेंडे या कलमामुळे निर्माण झाले होते. जनसंघाच्या स्थापनेपासून आम्ही याला विरोध केला आहे. जनसंघाचे संस्थापक शामाप्रसाद मुखर्जी यांनी, तर 370 रद्द करण्यासाठी स्वत:चे बलिदानही दिले आहे. केंद्रात भारतीय जनता पार्टीला बहुमत मिळताच 370 कलम आणि 35 ए रद्द केले आहे. या दोन्हींमुळे काश्‍मीरला दर्जा होता. ज्यामुळे काश्‍मीरमध्ये भारतीय कायदे चालत नव्हते. 
मूळ काश्‍मिरी सोडून इतरांना मतदानाचाही अधिकार नव्हता. धर्मानुसार तेथे विधानसभेत प्रतिनिधित्व दिले असून मुस्लिमांचे प्रमाण 37 टक्के असूनही त्यांना 50 टक्‍क्‍यांपेक्षा जादा प्रतिनिधीत्व दिले आहे. 

ते म्हणाले, काश्‍मीर भारतात असूनही पूर्वी भारताच्या कोणत्याही राज्यातून काश्‍मीरमध्ये जाण्यासाठी परमीट (व्हिसा) लागत होता. पण भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेपासून याला विरोध केला. 2019 मध्ये लोकसभेत आणि राज्यसभेतही बहुमत मिळाल्यानंतर प्रथमच 5 ऑगस्टला 370 वे कलम हे पूर्ण राज्यघटनेतील अधिकारानुसार घटनात्मकरीत्या रद्द केले. विजय जाधव यांनी स्वागत केले. 
यावेळी श्री. चिकोडे, ऍड. इंदुलकर यांची भाषणे झाली. अशोक देसाई, नगरसेविका भारती शेटके, विजयसिंह खाडे-पाटील, अजित ठाणेकर, सविता भालकर आदी उपस्थित होते. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP spokesman Madhav Bhandari comment