गुंडगिरी-पळवापळवी हाच "करेक्‍ट' कार्यक्रम :  चंद्रकांत पाटील

जयसिंग कुंभार
Saturday, 27 February 2021

भाजपच्या पराभवावर प्रथमच केलं भाष्य 

सांगली: सांगली महापालिकेत कॉंग्रेस आघाडीने घडवून आणलेले सत्तांतर गुंडगिरी आहे. तोच त्यांचा करेक्‍ट कार्यक्रम आहे असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत केला. विधानसभा अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर ते पत्रकारांशी बोलत होते.  पाटील यांनी यानिमित्ताने प्रथमच सांगली महापालिकेतील भाजपच्या पराभवावर भाष्य केले आहे. 

ते म्हणाले," सांगलीत राष्ट्रवादी व कॉंग्रेसने भाजपच्या सात नगरसेवकांना अक्षरक्ष पळवून नेले. काहींना केसेस मध्ये जामीन मिळवून देण्याचे खोटे सांगितले गेले. काहींना पळवून नेऊन त्यांच्या नातेवाईंकांनाही आम्हाला भेटून दिले नाही. यालाच ते करेक्‍ट कार्यक्रम म्हणत असतील तर उत्तम आहे. ती त्यांची जबाबदारी घेत आहेत हे चांगलेच आहे. त्याला आता जनताच उत्तर देईल. तेच घोडेबाजार घोडेबाजार म्हणायचे आणि त्यांनी तेच केले.

हेही वाचा- संजय राठोड यांचा राजीनामा घ्या अन्यथा... ; चंद्रकांत पाटील यांचा राज्य सरकारला इशारा -

आमचं कौतुक केलं पाहिजे की अशा प्रकारच्या कोणत्याही प्रकारात दंगली उसळल्या असत्या. मोर्चे निघाले असते. आम्ही कार्यकर्त्यांना थेट सांगितलं. त्यांना जे करायचे ते करु द्या. नागरीकच त्यांना उत्तर देतील. या सर्व प्रकाराची आम्ही चौकशी केली आहे. ज्यांनी विरोधी मतदान केले त्यांना नोटीशी दिल्या जातील. कायद्यानुसारची कारवाई होईल.'' ते म्हणाले," मी दोन दिवस आधी सांगलीत गेलो होतो. सारेजण उपस्थित होते. जेवणही एकत्र केलं. फुटीरांपैकी काही फॉर्म भरायलाही हजर होते. मात्र शेवटी ते गेले. असो आम्ही 36 मते टिकवली.'' 

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP state president Chandrakant Patil speech on kolhapur political marathi news