esakal | मतदारसंघ सेनेच्या वाट्याचा; भाऊगर्दी मात्र भाजप नेत्यांची
sakal

बोलून बातमी शोधा

ShivSena-BJP

मतदारसंघ सेनेच्या वाट्याचा; भाऊगर्दी मात्र भाजप नेत्यांची

sakal_logo
By
दत्तात्रय खंडागळे

सांगोला : भाजप-शिवसेना युतीमध्ये 'आमचं ठरलंय' असे सांगत असले तरी सांगोल्यात महायुतीकडून उमेदवारासाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. आमदार गणपतराव देशमुख यांच्या माघारीमुळे महायुतीमधील जुने-नवे उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून विधानसभेच्या तयारीसाठी सरसावले आहेत.

शेकापचा बालेकिल्ला म्हणून सांगोल्याची ओळख आहे. येथील आमदार गणपतराव देशमुख यांनी यावेळच्या विधानसभेमधून प्रकृतीच्या कारणास्तव माघार घेतल्याचे जाहीर केले. परिणामी, महायुतीमध्ये ही जागा शिवसेनेच्या वाट्याची असल्यामुळे शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांची उमेदवारी फिक्स मानली जात आहे. शहाजी पाटील यांनी गेल्या अनेक निवडणुकीत आमदार देशमुख यांना कडवे आव्हान दिले आहे.

सध्या शहाजी पाटील हे शिवसेनेत असले तरी त्यांचा संपर्क भाजपमधील बड्या नेत्यांशी राहिला आहे. त्यामुळे पाटील हे सध्या शिवसेनेत आहेत की भाजपमध्ये याची चर्चा जनतेत सुरू आहे. सेना-भाजप युती तुटल्यास पाटील हे शिवसेनेचे उमेदवार असतील का? याबाबत मात्र शाश्वती देता येत नाही. भाजपकडून तालुकाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

भाजपाच्या राजश्री नागणे यांनी तालुक्यात महिला मेळावे, शेतकरी मिळावे आणि गावभेट दौरा करीत आपणच महायुतीचे उमेदवार होऊ शकतो यादृष्टीने तयारी केली आहे. राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये दाखल झालेले चेतनसिंह केदार पक्षाने आपणास उमेदवारी दिली, तर सर्व ताकदीने विधानसभा लढवू, असे सांगत आहेत. केदार यांनी भाजपात येताच नवीन सभासद नोंदणीचे काम हाती घेतल्याने त्यांच्या उमेदवारीकडे नवीन व तरुण चेहरा म्हणून सर्वांचे लक्ष आहे.

मतदारसंघ सेनेचा असला तरी भाजपमधून अनेकजण विधानसभेच्या निवडणुकीसाठी मैदानात उतरण्यासाठी तयारीला लागले आहेत. शेकापमध्ये आमदार देशमुख यांनी माघारी घेतल्याने कोणाला उमेदवारी मिळते, याकडेच सर्वांचे लक्ष आहे; परंतु आमदार देशमुख हे लढतील की नाही हे सांगता येत नाही. ऐनवेळी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव ही शेवटची निवडणूक म्हणून ते यावेळच्या निवडणुकीला सामोरेही जातील, असे त्यांचे कार्यकर्ते सांगत आहेत.

दीपक आबा लढणारच 
माजी आमदार दीपक आबा साळुंखे-पाटील यावेळच्या विधानसभेला निवडणुकीसाठी कामाला लागल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या पक्षांतराची चर्चा सध्या तालुक्यात चर्चेचा विषय झाली आहे. कार्यकर्ते मात्र यावेळी आबा निवडणुकीला उभे राहणारच असे सांगत आहेत. राष्ट्रवादीकडून भाळवणी गटाचे व सध्या पुण्यात स्थायिक असलेले उद्योजक संजय पाटील यांनीही राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविणार असल्याचे सांगत इच्छुकांच्या संख्येत भर घातली आहे.

loading image
go to top