
द्र सरकार गरीब, सर्वसामान्यांच्या दु:खाकडे काणाडोळा करत आहे असा आरोप कॉंग्रेसचे नेते राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी येथे बोलताना केला.
सांगली : केंद्रातील भाजप सरकारच्या धोरणांमुळे महागाई सातत्याने वाढत आहे. गॅस, डिझेल, पेट्रोलचे दर आकाशाला भिडले आहेत. जनतेची प्रचंड पिळवणूक सुरु आहे. केंद्र सरकार गरीब, सर्वसामान्यांच्या दु:खाकडे काणाडोळा करत आहे असा आरोप कॉंग्रेसचे नेते राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी येथे बोलताना केला.
पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीच्या निषेधार्थ आज कॉंग्रेसच्या वतीने सांगलीत केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. पक्षाचे नेते मंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस कमिटीसमोर झालेल्या आंदोलनात शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, श्रीमती जयश्री पाटील, विशाल पाटील, महापालिकेतील विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, युवा नेते डॉ. जितेश कदम उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री डॉ. कदम म्हणाले, गेल्या अनेक दिवसांपासून केंद्र सरकारच्या धोरणामुळे देशात महागाई सातत्याने वाढत आहे. गेल्या वर्षभरात कोरोनाच्या संकटात जनतेला संघर्षपूर्ण जीवन जगावे लागले. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, पगार कमी झाले. अशावेळी अर्थसंकल्पात सर्वसामान्य जनतेला मदतीचा हात द्यावा अशी केंद्राकडून अपेक्षा होती. मात्र त्याचाही भंग झाला आहे.
एकीकडे कोरोनाचे संकट आणि आरोग्याच्या अडचणी असताना पेट्रोल, डिझेलचे दर शंभरच्या घरात गेले आहेत. गॅसचे दर आकाशाला भिडले आहेत. सर्वसामान्य जनतेची प्रचंड मोठी पिळवणूक होत आहे. त्यामुळे कॉंग्रेसच्या वतीने आज दरवाढ कमी करण्यासाठी आंदोलन केले. केंद्र सरकारने सहानुभूतीने विचार करुन दरवाढ कमी करावी अशी आमची मागणी आहे.
याबरोरबच केंद्रातील भाजप सरकार सर्वसामान्य जनतेच्या दु:खाकडे काणाडोळा करत आहे. त्यांना जागे करण्यासाठी शेतकरी आंदोलन करत आहेत. कृषी कायद्यातील जाचक अटी जोवर केंद्रातील सरकार रद्द करणार नाही तोवर शेतकऱ्यांच्या पाठीशी कॉंग्रेस ठामपणे उभे आहोत, असेही डॉ. कदम म्हणाले.
यावेळी नामदेवराव मोहिते, नगरसेवक मंगेश चव्हाण, अभिजित भोसले, मनोज सरगर, अमर निंबाळकर, मयूर पाटील, संजय मेंढे, संतोष पाटील, फिरोज पठाण, रविंद्र खराडे, वहिदा नायकवडी, आरती वळवडे, शुभांगी साळुंखे, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
संपादन : युवराज यादव