‘लालफिती’त रेंगाळली रक्त विघटन सुविधा!

प्रवीण जाधव
गुरुवार, 14 जून 2018

सातारा - रक्त घटक स्वतंत्र करण्याची सुविधा ‘लालफिती’च्या कारभारामुळे रेंगाळली आहे. प्रारंभी इमारतीअभावी यंत्रणा परत गेली आणि आता इमारत उभी असूनही तीन वर्षे झाली तरी यंत्रणा मिळत नसल्याने सामान्य रुग्णांना रक्त घटकांसाठी आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

सातारा - रक्त घटक स्वतंत्र करण्याची सुविधा ‘लालफिती’च्या कारभारामुळे रेंगाळली आहे. प्रारंभी इमारतीअभावी यंत्रणा परत गेली आणि आता इमारत उभी असूनही तीन वर्षे झाली तरी यंत्रणा मिळत नसल्याने सामान्य रुग्णांना रक्त घटकांसाठी आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

रक्तात लाल रक्तपेशी, प्लाझ्मा व प्लेटलेट असे घटक असतात. वैद्यकीय क्षेत्रातील क्रांतिकारी संशोधनाने रक्तातील हे घटक स्वतंत्र करता येणे शक्‍य झालेले आहे. रक्त विघटन प्रक्रियेद्वारे लाल रक्तपेशी, प्लाझ्मा व प्लेटलेट हे तीन घटक वेगवेगळे करून रुग्णाला त्याच्या आवश्‍यकतेने देणे शक्‍य झाले आहे. त्यामुळे आवश्‍यकता नसताना संपूर्ण रक्त रुग्णाला द्यावे लागत नाही.

रक्तक्षय, किडनी व हृदयविकार, तसेच थॅलेस्मियाच्या रुग्णांना रक्त वाढीसाठी लाल रक्तपेशींची गरज असते. भाजून जखमी झालेल्या, तसेच जलोदराचा आजार असलेल्यांना रक्तातील ‘प्लाझ्मा’ या घटकाची गरज असते, तर डेंगी व कर्करोगाच्या रुग्णांना ‘प्लेटलेट’ आवश्‍यक असतात. त्यांना संपूर्ण रक्त देण्याची गरज नसते. आवश्‍यक तो घटक दिल्यामुळे रुग्णाच्या प्रकृतीत तातडीने सुधारणा होते. मात्र, ही सुविधा खासगी रक्तपेढींमध्येच उपलब्ध आहे. प्रक्रियेसाठी लागणारे यंत्र व इतर खर्चामुळे रक्त घटकांचा दर संपूर्ण रक्तापेक्षा जास्त असतो. त्यामुळे अनेक रुग्णांना ते घेता येत नाही, तर अनेकांना नाईलाजास्तव खर्च सोसावा लागतो.

रुग्णांची ही अडचण ओळखून शासनाने जिल्हा रुग्णालयात रक्त विघटनाची सोय उपलब्ध करण्याचा निर्णय सुमारे चार वर्षांपूर्वी घेतला. त्यानुसार रुग्णालयात मशिनही आल्या होत्या. परंतु, आवश्‍यक इमारत उपलब्ध नव्हती. त्यामुळे जिल्हा रुग्णालयासाठी आलेल्या मशिन पुन्हा पुण्याच्या मेट्रो ब्लड बॅंकेकडे पाठविल्या गेल्या. आता इमारत उभी राहून तीन वर्षे झाली आहेत. त्यामुळे यंत्रसामग्री उपलब्ध करावी म्हणून रुग्णालय प्रशासनाने शासनस्तरावर पत्रव्यवहार करून यंत्राची मागणी केली आहे. परंतु, अद्याप शासनाने त्याची दखल घेतलेली नाही. त्यामुळे इमारत धूळ खात पडून आहे. 

सामान्यांना वाली कोण?
जिल्ह्यातील सर्वसामान्य रुग्णांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली ही सुविधा सुरू करण्याला शासकीय कारभार जितका जबाबदार आहे, तितकेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे दुर्लक्षही कारणीभूत आहे. आरोग्य मंत्रालय असलेल्या पक्षाच्या आमदारांचेही त्याकडे लक्ष नाही आणि सत्ताधारी म्हणून जिल्ह्यात वावरणारे, जिल्ह्याच्या विकासासाठी बराच निधी आणत असल्याचा दावा करणारेही त्याकडे पाहात नाहीत. तर, सत्तेत नसल्यामुळे काही करता येत नाही, अशी मानसिकता राष्ट्रवादीच्या आमदारांनी करून घेतली आहे. डॉ. रामास्वामी हे जिल्हाधिकारी असताना रुग्णालयाकडे त्यांचे विशेष लक्ष असायचे. अपुऱ्या यंत्रणा त्यांनी तातडीने मिळवून दिल्या होत्या. मात्र, सध्याच्या  जिल्हाधिकाऱ्यांना रुग्णालयातील त्रुटींकडे लक्ष द्यायला वेळ नाही असेच दिसते. त्यामुळे सामान्यांना वाली कोण, असा प्रश्‍न निर्माण होत आहे. 

Web Title: Blood Disruption Facility issue