चेष्टा सहन न झाल्याने केला खून..अन

arun chavan.jpeg
arun chavan.jpeg

इस्लामपूर- किरकोळ वादातून राग मनात धरून प्रकाश चव्हाण (वय 22) याचा खून केल्याप्रकरणी अरुण बाळासो चव्हाण (वय 22, रा. भाटवाडी,ता. शिराळा) याला आज न्यायाधीश शेखर मुनघाटे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 


खटल्याची हकीकत अशी, मृत प्रकाश चव्हाण याने अरुण चव्हाणला तुझ्या बापाच्या दोन बायका आहेत तू कोणाचा आहेस असे चेष्टा मस्करीमध्ये चिडवले होते. त्याचा राग अरुणच्या डोक्‍यात होता. प्रकाशचा काटा काढायचा हे त्याने ठरविले होते. त्यामुळे प्रकाशचा रोजचा दिनक्रम कसा आहे याची त्याने माहिती घेतली होती. 


प्रकाश रोज रात्री त्यांच्या घरासमोरील शामराव चव्हाण यांच्या गच्चीवर झोपायला जातो हे त्याला माहीत होते. 8 डिसेंबर 2016 रोजी जेवण झाल्यावर साडेनऊच्या सुमारास तो अंथरूण घेवून झोपायला गेला. त्या घर मालकाचा नातू प्रेम त्याच्यासोबत होता. अरुणने रात्री पावणे दहाच्या सुमारास प्रकाशला फोन केला आणि बोलावून घेतले. भाटवाडीच्या बैलाच्या माळावर एका मुलीला भेटायला जायचे आहे म्हणून तो त्याला सोबत घेवून गेला होता.

त्याठिकाणी निर्जनस्थळी गेल्यावर अरुणने लोखंडी गजाने प्रकाशच्या डोक्‍यावर प्रहार केला. वर्मी घाव लागल्याने प्रकाश जागीच कोसळला. तो मृत झाल्याची खात्री झाल्यावर अरुणने त्याचा मृतदेह शेतातील ओघळीत टाकून दिला. त्याच्या खिशातील 700 रुपये व मोबाइल काढून घेतला. मोबाइलचे सिम कार्ड त्याने फेकून दिले. दुसऱ्या दिवशी प्रकाश घरी आला नाही म्हणून त्याचा शोध सुरू झाला. शोधूनही त्याचा ठावठिकाणा सापडत नसल्याने शिराळा पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली. 


दरम्यान अकरा तारखेला सायंकाळी सहाच्या सुमारास प्रकाशचा मृतदेह बैलाच्या माळावरील शेतात आढळला. याबाबत सागर चव्हाण यांनी 12 डिसेंबर 2016 ला शिराळा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी फिर्यादीनुसार अरुण चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल करून तपास केला. त्यानंतर न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. 


सरकारतर्फे खटल्यात सरकारी वकील रणजीत पाटील यांनी अकरा साक्षीदार तपासले. मृत प्रकाशसोबत गच्चीवर झोपायला असलेला प्रथमेश उर्फ प्रेम साळुंखे, वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्राणी पाटील यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. ऍड. पाटील यांनी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा द्यावी असा युक्तिवाद केला. न्यायाधीश शेखर मुनघाटे यांनी अरुण चव्हाण याला जन्मठेप व 5 हजार रुपये दंड अशी शिक्षा दिली. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com