मराठा सेवा पतसंस्थेत चाललंय तरी काय? 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 21 January 2020

संचालक मंडळ बरखास्ती व प्रशासक नियुक्तीला पदच्युत पदाधिकारी व संचालक मंडळातर्फे ज्ञानदेव पांडुळे यांनी आक्षेप अर्ज दाखल केला होता. तोही नाशिक विभागीय सहनिबंधकांनी फेटाळून लावला.

नगर : नगर जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक बरखास्तीचा जिल्हा उपनिबंधकांचा आदेश नाशिक विभागीय सहनिबंधक डॉ. ज्योती लाठकर यांनी कायम ठेवला. संचालक मंडळ बरखास्ती व प्रशासक नियुक्तीला पदच्युत पदाधिकारी व संचालक मंडळातर्फे ज्ञानदेव पांडुळे यांनी आक्षेप अर्ज दाखल केला होता. तोही नाशिक विभागीय सहनिबंधकांनी फेटाळून लावला. या संदर्भात पुढील सुनावणी येत्या 16 जून रोजी होईल, असा आदेश विभागीय सहनिबंधकांनी शुक्रवारी (ता. 17) दिला. 

निम्म्याहून अधिक संचालकांचे राजीनामे 
संस्थेच्या आर्थिक व्यवहारांवरील मतभेदांमुळे निम्म्यापेक्षा अधिक संचालकांनी मागील वर्षभरात राजीनामे दिले. अल्पमतातील संचालक मंडळाने मानद सचिवपद रद्द करण्यासह नियमबाह्य अनेक ठराव केले. त्याविषयी प्रतिवादी तथा मानद सचिव म्हणून ज्यांनी काम पाहिले होते, त्या प्रकाश कराळे यांनी तक्रार केली होती. त्यावरून अल्पमतातील संचालक मंडळाचे सर्वच ठराव रद्द करीत, संचालक मंडळच बरखास्त करण्याची कारवाई जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी मागील महिन्यात 23 तारखेला केली. पतसंस्थेवर सहकार अधिकारी पौर्णिमा सुर्वे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली. सुर्वे यांनी तातडीने प्रशासकपदाची सूत्रेही स्वीकारली. 

ठळक बातमी : बापूसमर्थकांचे ठरलं, राजूदादांचं पितळ उघडं पाडायचं 

पदाधिकाऱ्यांचे अपील 
पदच्युत केलेले पदाधिकारी व संचालक मंडळातर्फे ज्ञानदेव पांडुळे यांनी नाशिक सहनिबंधकांकडे अपील केले. त्यात जिल्हा उपनिबंधक द्विग्विजय आहेर यांनी केलेली कारवाई चुकीची असल्याची भूमिका मांडली. तथापि, सहनिबंधकांनी त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरला नाही. जिल्हा उपनिबंधकांनी केलेल्या कारवाईचे समर्थन करणारी भूमिका निकालपत्रात मांडली. पदच्युत अध्यक्ष विजयकुमार ठुबे, उपाध्यक्ष सतीश इंगळे यांच्यासह संचालक ज्ञानदेव पांडुळे, किशोर मरकड, राजश्री शितोळे, निर्मला गिरवले व शोभा जाधव यांच्यातर्फे एकत्रितपणे पांडुळे यांनी नाशिक सहनिबंधकांच्या कार्यालयात अपील केले होते. तथापि, संचालक मंडळाच्या बरखास्तीचा जिल्हा उपनिबंधकांचा निर्णयच योग्य असल्याचा निर्वाळा सहनिबंधक डॉ. लाठकर यांनी दिला. त्यामुळे अल्पमतातील या पदच्युत संचालक मंडळाचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. 

न्यायालयात धाव 
संचालक मंडळ बरखास्ती व प्रशासक नियुक्तीच्या मुद्द्यावर जिल्हा उपनिबंधकांनी बजावलेल्या नोटिशीला उत्तर देण्याऐवजी त्या वेळी अध्यक्ष-उपाध्यक्षांनी ही नोटीसच रद्द करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली. जिल्हा उपनिबंधकांच्या या नोटिशीला आव्हान देणारी याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. जिल्हा उपनिबंधक यांच्याकडेच भूमिका मांडण्याचा आदेश दिला. उपरोक्त विषयाबाबत योग्य ते म्हणणे जिल्हा उपनिबंधक यांच्यासमोरच मांडा, असेही आदेशात नमूद केले होते. त्यामुळे जिल्हा उपनिबंधकांनी बजावलेल्या नोटिशीला विद्यमान पदाधिकाऱ्यांनी खुलासेवजा उत्तर दिले होते. त्यानंतर नाशिक सहनिबंधकांसमोर या वादावर सुनावणी झाली. 

प्रशासकपदाची धुरा बदलली 
जिल्हा उपनिबंधकांनी पहिल्या आदेशात पतसंस्थेचा कारभार पाहण्यासाठी नगर तालुका उपनिबंधक कार्यालयातील सहकार अधिकारी पौर्णिमा सुर्वे यांची नेमणूक केली होती. तथापि, त्यांना संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी अपेक्षित सहकार्य न केल्याने पदभार घेण्यापलीकडे त्यांना काम करता आले नाही. त्यामुळे सहकार उपनिबंधकांनी पुन्हा दुसरे सहकार अधिकारी किरण आव्हाड यांच्याकडे प्रशासकपदाची सूत्रे सोपविली. त्यामुळे पतसंस्थेवर एकाच महिन्यात दुसऱ्या प्रशासकांना पदभार घ्यावा लागला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Board of Directors dismissed decision Permanent