बनावट नोटा चलनात आणणारी टोळी जेरबंद; लाखाच्या नोटा जप्त

शैलेश पेटकर
Sunday, 10 January 2021

दोनशे आणि दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणणारी टोळी सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या विभागाने जेरबंद केली.

सांगली ः दोनशे आणि दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणणारी टोळी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या विभागाने जेरबंद केली. त्यांच्याकडून लाखाच्या बनावट नोटांसह कलर प्रिंटर, एलसीडी स्क्रीन, स्कॅनर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सोलापूर जिल्ह्यातील मोरोची येथे नोटा बनविणाऱ्या संशयितासही अटक करण्यात आली. 

विजय बाळासो कोळी (वय 33, रा. अमर चौक, रेठरेधरण, सध्या रा. दत्तनगर, कुपवाड), शरद बापू हेगडे (34, रा. राम-रहिम कॉलनी, संजयनगर) आणि तेजस ऊर्फ भावड्या सूर्यकांत गोरे (23, गावठाण मोरोची, ता. माळशिरस, जि. सोलापूर) अशी त्यांची नावे आहेत. संशयितांनी 200 आणि दोन हजारांच्या नोटा चलनात आणल्या आहेत, अशी माहिती पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली. 

अधिक माहिती अशी, की जिल्ह्यात बनावट नोटा चलनात आल्याची गोपनीय माहिती पोलिस अधीक्षक गेडाम यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी तातडीने संशयितांचा शोध घेऊन कारवाईचे आदेश "एलसीबी'ला दिले. त्यानुसार निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली खास पथक तयार करण्यात आले. पथकातील पोलिस कुपवाड परिसरात गस्तीवर होते. त्या वेळी कुपवाडमधील दत्तनगर येथे रेकॉर्डवरील गुन्हेगार विजय कोळी व शरद हेगडे संशयास्पदरीत्या फिरताना आढळले. झडती घेतली असता विजय कोळी याच्याकडे दोन हजारांच्या दहा नोटा, तर हेगडे याच्याकडे 29 नोटा सापडल्या. नोटांची तपासणी केली असता त्या बनावट असल्याचे दिसून आले. 

विजय याच्याकडे चौकशी केली असता शरद याने नोटा चलनात आणण्यासाठी दिल्याची कबुली दिली. तसेच, शरद याच्याकडे चौकशी केली असता त्याचा नातेवाईक भावड्या गोरे याने या नोटा बनविल्याची कबुली दिली. त्यानुसार "एलसीबी'च्या पथकाने तातडीने सोलापूर जिल्ह्यात छापा मारला. गोरे याच्या घरात बनावट नोटा आढळून आल्या. 

फोटोशॉपचा आधार 
संशयित तेजस गोरे हा पदवीधर आहे. मोरोची येथे त्याचा फोटोचा स्टुडिओ आहे. चार महिन्यांपूर्वी त्याने फोटोशॉप या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून नोटा बनविल्या होत्या. नोटांवरील वॉटरमार्क, हिरव्या रंगाची स्ट्रीपही हुबेहूब साकारण्यात आली होती. त्या शरद याच्याकडे चलनात आणण्यासाठी दिल्या. शरद हा विजयचा मित्र आहे. संशयितांनी नेमक्‍या किती रुपयांच्या नोटा चलनात आणल्या आहेत, याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

वारीत खपविल्या नोटा 
पंढरपूरच्या वारीत संशयितांनी नोटा खपविल्याचे तपासात पुढे आले. तसेच, एका व्यक्तीकडून बनावट नोटा देऊन सोने खरेदीही केल्याचे समोर आले आहे. परंतु, ते सोनेही बनावट असल्याचे तपासात समजले. नोटा बनवण्यासाठी कागद पुण्यातून आणल्याचे संशयित तेजस याने पोलिसांना सांगितले. 

लाखाला 25 हजार 
संशयित तेजस याने काही महिन्यांपूर्वी फोटोशॉपद्वारे नोटा प्रिंट केल्या होत्या. अगदी हुबेहूब दिसणाऱ्या या नोटा सर्रास बाजारात खपत असल्याचे समोर आले. त्यानंतर तेजसने नातेवाईकाच्या मदतीने त्या चलनात आणण्याचा विचार केला. 25 हजार रुपयांच्या खऱ्या नोटा दिल्यावर एक लाखांच्या बनावट नोटा ही टोळी देत असल्याचे तपासात पुढे आले आहे. 

संपादन : युवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bogus notes selling gang arrested; Lakhs of notes seized