नगरमध्ये बॉम्बस्फोट, एक ठार, लष्कर अलर्ट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

नगरमध्ये झालेल्या बॉम्बस्पोटात एक जण ठार झाला आहे. नगर तालुक्यातील खारे कर्जुने येथे हा प्रकार घडला. या घटनेने नगर शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ही घटना घडली ती लष्कराची हद्द आहे.

नगर: नगर शहराजवळील खारेकर्जुने परिसरात बॉम्बस्फोट झाला आहे. त्यात एकजण जागीच ठार झाला. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. बॉम्बस्फोट झालेले ठिकाण हे लष्कराच्या हद्दीजवळ आहे. त्यामुळे लष्कराचे अधिकारीही सतर्क झाले आहेत. आतापर्यंत झालेली ही दहावी घटना असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. 

नेमके काय होतं केके रेंजवर 
अधिक माहिती अशी, नगर शहरालगत लष्कराची मोठी हद्द आहे. खारेकर्जुने शिवारात लष्करचा प्रशिक्षणाचा तळ आहे. तेथे लष्करी जवानांचा युद्धसराव चालतो. त्या युद्धसरावादरम्यान तोफगोळे डागले जातात. काहीवेळा डागलेले गोळ्यांचा स्फोट होत नाही. हे डागलेले गोळ्यांचे अवशेष जमा करण्यासाठी ठेकेदाराची नेमणूक केली आहे. मात्र, त्याची नजर चुकवून परिसरातील लोक ते तोफगोळ्यांचे तुकडे जमा करतात. ते तुकडे भंगार म्हणून विकतात. त्यातून चांगली कमई होत असल्याने परिसरातील लोक जीवावर उदार होऊन केके रेंजमध्ये घुसतात. त्यामुळे आतापर्यंत किमान दहाजणांना जीव गमवावा लागला आहे. अनेक जायबंदी झाले. 

असा निकामी करतात बॉम्ब 
भंगार गोळा करताना तोफगोळे सापडतात. ते लष्करी हद्दीच्या बाहेर आणून फोडण्याचा प्रयत्न होतो. किंवा निकामी केले जातात. त्यातील लोखंड आणि शिसे बाहेर काढतात. त्यातून ते पैसे कमावतात. एखादा तोफगोळ्याचा स्फोट होतो, त्यात जीव गमवावा लागतो. 

यांचा गेला जीव 
याच प्रकारची घटना आज सकाळी के. के. रेंज परिसरात खारेकर्जुने शिवारात भिंगार गोळा करण्यासाठी काही लोक सुरक्षारक्षकाची नगर चुकवून गेले होते. तेथील एक बॉम्ब लष्करी हद्दीबाहेर आणून तो फोडण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्याचा स्फोट झाल्याने भाऊ साधू गायकवाड (वय 55, रा. खारेखर्जुने, ता. नगर) यांचा जागीच मृत्यू झाला. 

पोलीस तात्काळ घटनास्थळी 
बॉम्ब स्फोट झाल्यानंतर पोलिस उपअधीक्षक अजित पाटील, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक मोहन बोरसे यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या स्फोटात किती जखमी झाले आहेत, याची माहिती मिळू शकली नाही. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bomb blast in the Ahmednagar, one killed, two injured