रुग्ण, कर्मचारी वाचतात पुस्तके !

धर्मवीर पाटील
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

इस्लामपूर - दवाखान्यात गेलं की चिंता, काळजी, आजार, निदान, औषधोपचार, औषधे, मेडिकल, बिल यापेक्षा वेगळे काही नसते. इस्लामपुरातील ‘आधार’ इस्पितळ याला अपवाद आहे. इथे दवाखान्यातील सर्व उपचार होतातच; पण त्याहीपुढे जाऊन इथे कर्मचारी आणि रुग्णांसाठी वाचायला पुस्तके उपलब्ध आहेत.

इस्लामपूर - दवाखान्यात गेलं की चिंता, काळजी, आजार, निदान, औषधोपचार, औषधे, मेडिकल, बिल यापेक्षा वेगळे काही नसते. इस्लामपुरातील ‘आधार’ इस्पितळ याला अपवाद आहे. इथे दवाखान्यातील सर्व उपचार होतातच; पण त्याहीपुढे जाऊन इथे कर्मचारी आणि रुग्णांसाठी वाचायला पुस्तके उपलब्ध आहेत. डॉ. योगेश वाठारकर यांनी ही संकल्पना राबवली आहे. विविध विषयांवरील सुमारे अडीच हजार पुस्तके या ग्रंथालयात उपलब्ध आहेत.

वाचन मनाची मशागत करते. निरोगी आणि निरामय राहण्यासाठी खरे उपचार मनावर व्हावे लागतात. वाचन थेट मनावर परिणाम करते आणि निम्मे आरोग्य पुस्तकांच्या सान्निध्यात सुधारते. नेमका हाच धागा  पकडून डॉ. वाठारकर यांनी त्यांच्या आधार  हॉस्पिटलमध्ये ग्रंथालय सुरू केले आहे. अनेकजण त्याचा लाभ घेत आहेत. आजाराचे निदान, उपचार आणि रुग्ण बरा करण्याच्या प्रक्रियेत पुस्तके खूप मोठे काम करत असल्याची भावना डॉ. वाठारकर यांची आहे. दररोज दुपारी एक ते तीन या वेळेत ही पुस्तके दिली जातात. कर्मचारी ही पुस्तके घरी वाचायला नेतात. रुग्ण उपचारासाठी दाखल असतात, त्या काळात ही पुस्तके वाचतात. पश्‍चिम महाराष्ट्रातील हा अभिनव उपक्रम असून याची दखल अन्य काही ठिकाणी घेतली जात आहे.

पुस्तकांनी माणसाचे आयुष्य घडते. जगणे बदलते. मी स्वतः वाचतो आणि इतरांनाही वाचायला प्रवृत्त करतो. त्यातूनच माझ्याकडे असणाऱ्या कर्मचारी आणि उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांनीदेखील पुस्तके वाचावीत, अशी कल्पना सुचली. लोक वाचतात. त्यातून मनाला उभारी मिळते. माझ्याकडे असलेल्या पुस्तकातील एकही पुस्तक निराश करणारे नाही. त्यांना पुस्तक सहज उपलब्ध होणे महत्त्वाचे असते. उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
- डॉ. योगेश वाठारकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: books library in Adhar Hospital for Patient and employee