वडिलांच्या खांद्यावरून पडला खाली; लेंगरे येथे सात वर्षीय मुलाचा पुराच्या पाण्यात वाहून मृत्यू

सचिन निकम
Tuesday, 13 October 2020

लेंगरे (ता. खानापूर, जि. सांगली) येथे धुवॉंधार पावसाने शेतातील तालीला आलेल्या पुरात वडिलांच्या खांद्यावर बसलेला मुलगा केदार संतोष कांडेसर (वय 7) पाण्यात पडून वाहून गेला. र

लेंगरे : लेंगरे (ता. खानापूर, जि. सांगली) येथे धुवॉंधार पावसाने शेतातील तालीला आलेल्या पुरात वडिलांच्या खांद्यावर बसलेला मुलगा केदार संतोष कांडेसर (वय 7) पाण्यात पडून वाहून गेला. रविवार (ता. 11) दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडल्यानंतर बचाव पथकाद्वारे त्याचा शोध घेण्यात आला. मात्र त्याचा शोध लागला नाही. आज (ता. 12) त्याचा मृतदेह झाडा-झुडपात अडकेला सापडला. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, रविवारी सकाळी केदार व त्याचे वडील संतोष कांडेसर गावातील ताट परिसरात असणाऱ्या गोठ्यातून म्हशी चरण्यासाठी शेतात गेले होते. दुपारी अचानक परतीचा पाऊस सुरू झाला. पावसाने रौद्ररूप धारण केल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. वाडी, वसत्यावरील सर्व पूल पाण्याखाली गेले. शेतातील तालीनांही पूर आला.

दरम्यान, पाऊस कमी होत नसल्याने संतोष यांनी म्हशींना गोठ्यात बांधल्या व मुलगा केदारला खांद्यावर घेऊन ते तालीला आलेल्या पाण्यातून घराकडे निघाले. संतोष यांचा तोल गेल्याने खाद्यांवर बसलेला मुलगा केदार पाण्यात पडला. पावसामुळे पाण्याच्या वाढत्या प्रवाहात केदार वाहून गेला. वडील संतोष यांनी केदारचा पाण्यात शोध घेतला मात्र तो सापडला नाही. यानंतर वडिलांनी प्रशासनास याची माहिती दिली. प्रशासनाकडून केदाराला शोधण्यासाठी बचाव पथकाला पाचारण करण्यात आले.

मात्र मुसळधार पाऊसामुळे शोधकार्यात अडचणी निर्माण होत होत्या. शेवटी आज (सोमवार) पाऊस कमी झाल्यानंतर बचाव पथकाद्वारे त्याचा शोध घेण्यास पुन्हा सुरुवात झाली. परिसरातील काटेरी झाडा-झुडपात केदारचा मृतदेह अडकलेला सापडला. मुलाचा मृतदेह पाहून केदारच्या आईने हंबरडा फोडला. तहसीलदार ऋषीकेत शेळके, सहायक पोलिस निरीक्षक पांडुरंग कन्हेर यांनी घटना स्थळाची पाहणी करून माहिती घेतली. अवघ्या सात वर्षाच्या मुलाच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A boy Fell down from his father's shoulders; Seven-year-old boy dies in flood waters at Langare