ब्रेकिंग : लग्नाचा गुपचूप उडवला बार अन दाखल झाला गुन्हा.. 

marriage.jpg
marriage.jpg

सांगली-कोरोना' विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी गर्दी न जमवण्याचा आदेश धुडकावून धडाक्‍यात लग्नाचा बार वाजवून दिल्याबद्दल भिलवडी आणि कोकरूड पोलिस ठाण्यात चौघा व्याहींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस कर्मचारी यांनी याबाबत आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार फिर्याद दिली आहे. 


"कोरोना' विषाणूने जगभर धुमाकूळ घातला असून जगभरात दहा हजार जणांचा मृत्यू आतापर्यंत झाला आहे. देशातही कोरोना बाधित रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे सर्वत्र दक्षता घेण्याचे आवाहन केले जात आहे. जनजागृतीपवर फलक लावले आहेत. मोबाईलच्या "डायलर टोन' मधून सावधगिरीचा उपाय सांगितला जात आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. गावोगावच्या यात्रा, जत्रा, उरूस आणि सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. लग्न समारंभातील गर्दी टाळण्यासाठी मंगल कार्यालयांना नोटीसा पाठवून कारवाईचा इशारा दिला आहे. 


"कोरोना' विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशभर गडबड सुरू असताना औदुंबर (ता. पलूस) येथे घाईगडबडीने लग्न कार्याचा समारंभ गुरूवारी (ता.19) दुपारी सव्वा बाराच्या मुहूर्तावर उरकण्यात आला. औदुंबर येथील भक्तनिवासजवळ एका घरासमोर पूनम आणि प्रकाश हे विवाहेच्छुक लग्नाच्या बेडीत अडकले. लग्न समारंभासाठी दोन्ही कुटुंबातील नातेवाईक आणि शेजारी-पाजारी जमले होते. जवळपास शंभर पै-पाहुणे लग्नासाठी उपस्थित होते. लग्नाचा बार उडवून दिल्यानंतर कोणीतरी भिलवडी पोलिस ठाण्यात निनावी फोनद्वारे माहिती दिली.

त्यामुळे तत्काळ पोलिस घटनास्थळी हजर झाले. तेथे लग्नकार्य पार पडल्याची माहिती मिळाली. लग्न कार्यासाठी गर्दी जमवून आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग केला म्हणून मुलाच्या आणि मुलीच्या वडीलांविरूद्ध पोलिस कर्मचारी प्रविण प्रकाश जाधव (वय 32) यांनी भिलवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. दोघा व्याह्यांना गुन्हा दाखल केल्याबद्दल नोटीस बजावण्यात आली आहे. 


औदुंबरप्रमाणे ढाणकेवाडी (ता. शिराळा) येथेही लक्ष्मण हिनुकले (रा. ढाणकेवाडी) आणि रामचंद्र आप्पा कदम (रा. कदमवाडी) यांनी लग्न समारंभाचे आयोजन गुरूवारी (ता.19) सायंकाळी साडे पाचच्या मुहूर्तावर केले होते. तेथेही विवाहेच्छुक बोहल्यावर चढले. कोकरूड पोलिस ठाण्यात याची माहिती मिळाल्यानंतर तेथेही पोलिस पोहोचले. पोलिस कर्मचारी देवदास कोकणी (वय 35) यांनी हिनुकले आणि कदम या दोघांविरूद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि कलम 188 नुसार गुन्हा दाखल केला. 


औदुंबर आणि ढाणकेवाडी येथे लग्न समारंभ उरकले तरी याप्रकरणी चौघा व्याह्यांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली. आता थेट न्यायालयात त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केले जाणार आहे..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com