ब्रेकिंग : तुंगजवळ चिमुरडीचा गळा आवळून निर्घृण खून 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

तुंग (सांगली)- मिरज तालुक्‍यातील तुंग जवळील विठलाईनगर-चांदोली वसाहतीमधील सात वर्षाच्या चिमुरडीचा गळा आवळून निर्घृण खून केल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. चिमुरडी बुधवारी सायंकाळी दुकानात खायला आणायला म्हणून बाहेर पडली होती. रात्रीपासून सर्वत्र तिचा शोध सुरू होता. आज सकाळी ऊसाच्या शेतात तिचा मृतदेह आढळला. 

तुंग (सांगली)- मिरज तालुक्‍यातील तुंग जवळील विठलाईनगर-चांदोली वसाहतीमधील सात वर्षाच्या चिमुरडीचा गळा आवळून निर्घृण खून केल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. चिमुरडी बुधवारी सायंकाळी दुकानात खायला आणायला म्हणून बाहेर पडली होती. रात्रीपासून सर्वत्र तिचा शोध सुरू होता. आज सकाळी ऊसाच्या शेतात तिचा मृतदेह आढळला. 

विठलाईनगर ही चांदोली धरणग्रस्तांची वसाहत आहे. या वसाहतीतील पहिलीत शिकणारी सात वर्षाची चिमुरडी बुधवारी सायंकाळी दुकानातून खायला आणायला जातो म्हणून घराबाहेर पडली. त्यानंतर ती परतली नाही. उशिर झाला तरी ती परतली नाही. त्यामुळे आई-वडील तिचा शोध घेऊ लागले. रात्री आठच्या सुमारास वसाहतीमध्ये तिचा शोध सुरू झाला. परिसरातील नागरिक देखील शोधकार्यात गुंतले. जवळच्या शेतात देखील शोध घेतला. तरी देखील ती कोठे सापडली नाही. उशिरा शोधकार्य थांबवले. 

आज सकाळी पुन्हा चिमुरडीचा शोध सुरू केला. तेव्हा गावातील वासू पाटील यांच्या ऊसाच्या शेतात तिचा मृतदेह दिसला. त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. तत्काळ सांगली ग्रामीण पोलिसांना हा प्रकार कळवला. पोलिस निरीक्षक उमेश दंडिले यांनी पथकासह धाव घेतली. श्‍वान पथकाला आणि फॉरेन्सिक लॅबमधील पथकाला पाचारण केले. एलसीबी चे पथक देखील तत्काळ घटनास्थळी आले. ऊसाच्या शेतात चिमुरडीचा मृतदेह पडला होता. प्राथमिक तपासात तिचा लेगिन्सने गळा आवळून खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच डोक्‍यात एक छोटीसी जखम आहे. श्‍वान "तेजा' याच्या मदतीने मारेकऱ्यांचा शोध घेण्यात येत आहे. अप्पर पोलिस अधीक्षक मनीषा डुबुले, पोलिस उपाधीक्षक अशोक वीरकर यांनी ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक दंडीले तसेच एलसीबीच्या पथकास तपासाबाबत सूचना दिल्या. 

दरम्यान धरणग्रस्तांच्या वसाहतीतील चिमुरडीचा गळा आवळून खून केल्याची माहिती पसरताच नागरिक घटनास्थळी धावले. पोलिसांनी गर्दी हटवून तपासकार्य सुरू केले. प्राथमिक तपासात गळा आवळून खून केल्याचे स्पष्ट झाले असले तरी लैंगिक अत्याचार केल्याची शक्‍यता असून त्यादृष्टीने तपास सुरू आहे. ग्रामीण पोलिस आणि एलसीबीच्या पथकाने काही संशयितांची चौकशी सुरू केली आहे. गावात मात्र या खुनाने खळबळ उडाली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Breaking: Murder of a seven-year-old girl near Tung