ब्रेकिंग न्यूज ः नगरकरांनो तुमच्यासाठी हा आहे नवा आदेश

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 मार्च 2020

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, महापौर बाबासाहेब वाकळे, प्रभारी पोलिस अधीक्षक सागर पाटील, आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी सायंकाळी शहरात ठिकठिकाणी फिरून "जनता कर्फ्यू'ला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल नगरकरांचे आभार मानले. "घराबाहेर पडू नका, स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्या,' असे आवाहन द्विवेदी यांनी केले. 

नगर ः कोरोना व्हायरस च्या पार्श्वभूमीवर नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी नवीन निर्णय घेतला आहे. 
शासकीय सेवांशी निगडित वाहने, रुग्णवाहिका, अग्निशामक वाहने, वैद्यकीय उपचारासाठी लागणारी वाहने, शासकीय- निमशासकीय कार्यालये, सरकारी महामंडळांचे उपक्रम अथवा आस्थापनांचे अधिकारी- कर्मचाऱ्यांची वाहने, आजारी व्यक्‍ती, तसेच रुग्णालय, पॅथॉलॉजी लॅबोरेटरी, दवाखान्यांच्या आस्थापनेवरील अधिकारी-कर्मचाऱ्यांची वाहने, भाजीपाला विक्री करणारे फेरीवाले, एसटी महामंडळ व महापालिकेच्या बस, राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील मालवाहतूकीची वाहने, तसेच पत्रकारांच्या वाहनांना हा आदेश लागू नाही. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आदेशात स्पष्ट म्हटले आहे. 

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी महापालिका हद्दीत उद्यापासून (सोमवार) 31 मार्चपर्यंत सर्व खासगी वाहने, तसेच खासगी प्रवासी वाहनांना प्रतिबंध केला आहे. त्यामुळे वाहने घेऊन घराबाहेर पडता येणार नाही.

नगरकरांचे आभार! 
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, महापौर बाबासाहेब वाकळे, प्रभारी पोलिस अधीक्षक सागर पाटील, आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी सायंकाळी शहरात ठिकठिकाणी फिरून "जनता कर्फ्यू'ला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल नगरकरांचे आभार मानले. "घराबाहेर पडू नका, स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्या,' असे आवाहन द्विवेदी यांनी केले. 

बॅंकांना विविध सूचना 
बॅंकांमध्ये 31 मार्चपर्यंत रोखीने पैसे भरणे व काढण्याचीच कामे करावीत. या कामासाठी पुरेसे कर्मचारी नेमावेत. बॅंकांनी एका वेळी फक्त चार ते पाच खातेदारांना प्रवेश द्यावा. त्यांचे काम झाल्यानंतरच पुढील ग्राहकांना बोलवावे. दोन ग्राहकांमध्ये किमान एक मीटरचे अंतर ठेवावे. इंटरनेट, मोबाईल, यूपीआय, कॅश डिपॉझिट मशिनचा वापर करण्याबाबत जागृती करावी. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Breaking News This is a new order of the Collector for Ahmednagar