कृष्णेवरील कुडची पुलावर तिसऱ्यांदा पाणी ; आंतरराज्य वाहतूक पुन्हा बंद

एम. ए. रोहिले
Friday, 16 October 2020

कुडची पुलावरून वाहतूक बंद असल्याने सुमारे ४० किलो मीटर फिरुन वाहनधारकांना प्रवास करावा लागत आहे. 

रायबाग (बेळगाव)  : तालुक्यात कुडची येथे कृष्णा नदीवर असलेल्या पुलावर आज पहाटे पाणी आले. त्यामुळे जमखंडी-सांगली मार्गावरील आंतरराज्य वाहतूक यंदाच्या हंगामात तिसऱ्यांदा बंद झाली. या आधी २०१६ साली या पुलावर तीनवेळा पाणी आले होते, त्याची यंदा पुनरावृत्ती झाली. कुडची पुलावरून वाहतूक बंद असल्याने सुमारे ४० किलो मीटर फिरुन वाहनधारकांना प्रवास करावा लागत आहे. 

हेही वाचा -  नारायण राणे नावाचा दबदबा कायम ; सत्ता असो की नसो -

जमखंडीहून सांगलीला हारूगेरी क्रॉस, अथणी, कागवाडमार्गे सुमारे ४० किलो मीटर फेऱ्याने तर रायबागहून अंकली, मांजरी, कागवाडमार्गे ३० किलो मीटर  फिरुन जावे लागत आहे. 
पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने कृष्णेची पाणीपातळी अचानक वाढली आहे. परिणामी नदीकाठावरील गावांना धोका वाढला आहे. त्यामुळे तालुका प्रशासनाने कुडची, जलालपूर, दिग्गेवाडी, भिरडी, मायाक्का चिंचली, बुवाची सौंदत्ती, गुंडवाड, शिरगुर, सिद्धापूर, खेमलापूर, यल्पारट्टी, नसलापूर गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास ऊस व अन्य पिके पाण्याखाली जाण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनले आहेत.

तहसीलदारांकडून कृष्णाकाठच्या गावात पाहणी

कृष्णेची पाणीपातळी अचानक वाढली आहे. त्यामुळे आज सकाळी तहसीलदार चंद्रकांत बजंत्री व अधिकाऱ्यांनी कुडची, मायाक्का चिंचली, परमानंदवाडीसह नदीकाठावरील अन्य गावांना भेट देऊन पाहणी केली. तहसीलदार बंजत्री म्हणाले, तालुक्यातील संभाव्य पूरग्रस्त बारा गावात प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. पिकांच्या नुकसानीचा कृषी खात्यातर्फे सर्व्हे करण्यात येईल.

हेही वाचा - गव्यांच्या कळपाने घेरल्यावरही तो डगमगला नाही ; सिंधुदुर्गातील स्पेशल चाइल्डची संघर्षमय कहाणी -

पावसामुळे आजवर तालुक्यात २५ घरे व भिंती पडल्याची नोंद झाली आहे. खराब झालेल्या रस्त्यांचा अहवाल लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम खात्याला देण्यात आला आहे. गंभीर परिस्थिती उदभवल्यास दखता घेण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. नागरिकांनी परिस्थिती पाहून सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे. यावेळी कुडची येथे नगरपरिषदेचे मुख्याधिकाकीरी एस. ए. महाजन, उपतहसीलदार हिरेमठ व अधिकारी उपस्थित होते.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the breath from kudachi village on krishna river enters water and interstate transport stopped in belgaum