पूरग्रस्त सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत बीएसएनलची विनाशुल्क सेवा

संतोष भिसे
रविवार, 11 ऑगस्ट 2019

सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी बीएसएनएलने आठवडाभर मोफत सेवा जाहीर केली आहे.

मिरज - सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी बीएसएनएलने आठवडाभर मोफत सेवा जाहीर केली आहे. याअंतर्गत बीएसएनल मोबाईलधारकांना परस्परांशी अमर्याद मोफत कॉल करता येतील. अन्य कंपन्यांच्या मोबाईलवर दररोज वीस मिनिटे मोफत कॉलींग करता येईल. त्याशिवाय दररोज शंभर एसएमएस आणि एक जीबी डाटा विनाशुल्क देऊ केला आहे. 10  अॉगस्टपासून आठवडाभर ही सुविधा लागू राहणार आहे.

दरम्यान सांगली व मिरजेतील लँडलाईन दूरध्वनी सेवा काही प्रमाणात सुरु करण्यात बीएसएनएलला यश आले आहे. सांगलीत मुख्य कार्यालयात पाणी शिरल्याने वीजपुरवठा बंद आहे. स्टेशन चौकातील मुख्य एक्स्चेंजमधील डिजीटल पँनेलमध्ये पाणी शिरल्याने शॉर्ट सर्कीटचा धोका आहे, त्यामुळे त्याचा वीजपुरवठा सुरू करता येत नाही. बँटर्या व जनरेटरदेखील बंद आहेत. आज सकाळी बीएसएनएलचे उपमहाव्यवस्थापक वीरभद्र अलकुडे यांच्यासह अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकार्यांची भेट घेऊन वीजपुरवठ्याची मागणी केली. दुपारपर्यत वीजपुरवठा किंवा जनरेटर देऊ असे जिल्हाधिकारी म्हणाले.

पूरग्रस्त सांगली शहर व पश्चिमेकडील तालुक्यात वीजपुरवठा नसल्याने सेवा बंद आहे. सांगलीत मिरज ते विजयनगरपर्यंत सेवा सुरु झाली आहे. सांगली शहरात वीजपुरवठा मिळताच चोवीस तास यंत्रणा राबवून सेवा सोमवारी सकाळीपर्यंत सुरु करु. ब्रॉडबँड इंटरनेटही सध्या बंदच आहे 
- वीरभद्र अलकुडे, उपमहाव्यवस्थापक, बीएसएनएल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BSNL free service in flood-hit Sangli and Kolhapur districts