
हा निधी आर्थिक वर्षात खर्च करावा, अशी सूचना करण्यात आली आहे.
वाळवा (सांगली) : नटसम्राट बालगंधर्व स्मारक उभारणीच्या कामासाठी राज्य शासनाने 60 लाखांचा सहावा हफ्ता मंजूर केला आहे. हा निधी आर्थिक वर्षात खर्च करावा, अशी सूचना करण्यात आली आहे. आतापर्यंत या स्मारकासाठी तरतूद करण्यात आलेल्या 3 कोटी 46 लाख 74 हजार 505 रूपयांपैकी 2 कोटी 26 लाख 47 हजार 929 रुपये इतका खर्च झाला. नव्याने साठ लाखांचा निधी उपलब्ध झाल्यामुळे उर्वरित कामाला गती मिळेल.
जिल्हाधिकारी कार्यालयाला निधी उपलब्ध झाल्याचा शासकीय आदेश प्राप्त झाला आहे. नागठाणे (ता. पलूस) येथे बालगंधर्व स्मारक उभारण्यात येत आहे. तत्कालीन माजी मंत्री दिवंगत डॉ. पतंगराव कदम यांनी जवळपास साडेतीन कोटी रुपयांचा निधी बालगंधर्व स्मारकासाठी उपलब्ध करून दिला. सन 2009 च्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आली.
हेही वाचा - येत्या काही दिवसात हा उपक्रम सर्व भाषिकांसाठी खुला केला जाणार आहे
पहिल्या टप्प्यात जमीन विकासासाठी दहा लाख रुपये देण्यात आले. त्यानंतर 42 लाख 62 हजार, 50 लाख, एक कोटी, 23 लाख 85 हजार असा दोन कोटी 26 लाख 47 हजार 929 रुपयांचा निधी स्मारकासाठी राज्य शासनाने दिला. नव्याने साठ लाखांचा निधी उपलब्ध झाल्यामुळे उर्वरित कामाला गती येणार आहे.
नागठाणे येथे कृष्णा नदीकाठावर बालगंधर्व स्मारक उभारण्यात येत आहे. 28 गुंठे जागा हस्तांतरित करण्यात आली आहे. त्यापैकी सुमारे दहा गुंठे जागेत स्मारकाची इमारत उभारण्याचे काम सुरू आहे. इमारत तीन मजली आहे.
विविध दालने
नटश्रेष्ठ बालगंधर्व यांच्या कार्याला उजाळा देणारी विविध दालने आहेत. खुले नाट्यगृह, संगीत शाळा, वसतीगृह, ऑडीटोरीयम, शिल्पसृष्टीचा त्यात समावेश आहे. शेवटच्या मजल्यावर सध्या पत्रे बसवले जात आहेत.
2009 पासून अनेक धक्के
मुख्य इमारतीची उभारणी जवळपास पूर्ण झाली आहे. अंतर्गत कामे बाकी आहेत. स्मारकाचा बाह्य परिसर सुशोभिकरणाचे काम अजून सुरू झालेले नाही. अनेक राजकीय धक्के सोसत स्मारक एकेक टप्पा पार करत आहे. सन 2009 पासून स्मारकासाठी अनेक चढउतार गंधर्व प्रेमींनी अनुभवले आहेत.
हेही वाचा - काळ आला होता पण वेळ आली नव्हती..!
संपादन - स्नेहल कदम