अपघातात बसचालक जागीच ठार; वाहक जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bus driver killed accident conductor injured belgaum

अपघातात बसचालक जागीच ठार; वाहक जखमी

बेळगाव : भरधाव खासगी आराम बसने समोरील वाहनाला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात बसचालक जागीच ठार तर वाहक जखमी झाला. बुधवार (ता. १९) मध्यरात्री दोनच्या सुमारास पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील भूतरानमहट्टी गावानजीक राणी चन्नम्मा विश्वविद्यालय क्रॉसनजीक हा अपघात घडला. अपघाताची नोंद पोलिस काकती पोलिस ठाण्यात झाली आहे. सय्यदनासिरपाशा सय्यदकरीम (वय ५०, राहणार शरीफमोहल्ला कुनिगल मद्दुर रोड ता. कुनिगल जि. तुमकुर) असे मृत बस चालकाचे नाव आहे.

तर खालिदमोहम्मद शब्बीरसाब (वय ३१, राहणार निट्टुर ता. गुब्बी जि.‍ तुमकुर) असे जखमी वाहकाचे नाव आहे. वरील दोघेही नॅशनल ट्रॅव्हल्स बसवर काम करत होते. काल मध्यरात्री बंगळूरहून मुंबईकडे पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना चालक सय्यदनासिरपाशा हा बस भरधाव वेगाने बस चालवत होता. तसेच निष्काळजीपणाने ड्रायव्हिंग असताना भुतरामनहट्टी गावानजीकच्या आरसीयु क्रॉसजवळ बसची समोरील कोणत्यातरी वाहनाला जोरदार धडक बसली. त्यामुळे बसच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाल्याने चालक जागीच ठार तर वाहक जखमी झाला.

अपघातानंतर बस त्याचठिकाणी थांबल्याने मोठा अनर्थ टळला. बसमध्ये एकूण ३० प्रवासी होते. अपघात घडताच समोरील वाहतग्रस्त चालकाने वाहनासह पलायन केले. महामार्गावर मध्यरात्री घडलेल्या या अपघातानंतर पहाटेपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अपघाताची माहिती समजल्यानंतर सकाळी काकतीचे पोलीस निरीक्षक आय. एस. गुरुनाथ पोलीस उपनिरीक्षक अविनाश यरगोप्प व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. अपघातग्रस्त बस महामार्गावरून आठवण वाहतुकीला मार्ग मोकळा करून देण्यात आला.