esakal | कलकत्ता पान येईना, विडा रंगेना... झाले काय?
sakal

बोलून बातमी शोधा

Calcutta paan did,nt came, no paan for eating

पश्‍चिम बंगाल राज्यातून येणाऱ्या कलकत्ता पानाची आवकच बंद आहे. त्यामुळे विडा बनवण्याचे काम पूर्ण थांबले लाखो रुपयांची उलाढाल ठप्प आहे. 

कलकत्ता पान येईना, विडा रंगेना... झाले काय?

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सांगली ः लॉकडाऊनच्या दोन महिन्यांनंतर पानपट्टया उघडल्या गेल्या, मात्र पानाचा विडा काही रंगला नाही. पश्‍चिम बंगाल राज्यातून येणाऱ्या कलकत्ता पानाची आवकच बंद आहे. त्यामुळे विडा बनवण्याचे काम पूर्ण थांबले लाखो रुपयांची उलाढाल ठप्प आहे. 

याघडीला स्थानिक देशी पानांवर सगळी भिस्त आहे. अनेक पानपट्टी चालकांनी कलकत्ता पान उपलब्ध नसल्याने विडा बनवण्याचे काम थांबवले आहे. जी काही मोजकी पाने उपलब्ध आहेत त्याची किंमत दुप्पट, तिप्पट झाली आहे. जिल्ह्यातील पानपट्टीतील केवळ पान विड्यांची उलाढाल लाखो रुपयांच्या घरात आहे. सांगली, मिरजेत एकेका पानपट्टीत दररोज 20 ते 25 हजारांचा पानांचा गल्ला आहे. रुची पान मंदिरसारख्या ठिकाणी चारशे प्रकारची पाने विकली जातात. काही पान व्यावसायिकांचा ब्रॅंड आहे. लाखोंची उलाढाल असलेले हे व्यावसायिक क्षेत्र आहे. कोरोनाचे संकटात दहा हजारांवर व्यावसायिक संकटात आहेत. 

पान शौकिनांची संख्या प्रचंड आहे. त्यातही ब्रॅंड असतो. पार्टीसाठी शेकडो पानांची ऑर्डर असते. हे सारे दोन महिन्यांपासून बंद होते. कोरोना संकटात लॉकडाऊन झाल्यानंतर अनेक व्यसनांना पायबंद घातला गेला, आता पुन्हा एकदा पानपट्टया सुरू झाल्या आहेत, मात्र पानच नाही. त्यातही कलकत्ता पानांचा तुटवडा आहे. 

चोखंदळ शौकिनांसाठी पानाचे तब्बल चारशेहून अधिक प्रकार आहेत. काही तंबाखूयुक्त तर अनेक तंबाखूमुक्त. हे सारे विडे बनतात कलकत्ता पानात. तळहाताएवढे मोठेच्या मोठे पान, थोडे जाडसर आणि चवीला एकदम भन्नाट, असे पान व्यावसायिक युसुफ जमादार सांगतात. पश्‍चिम बंगालमधून कलकत्ता पानांची आवक पूर्ण थांबलेली आहे. कोरोना संकटाच्या आधी दोन रुपयांना एक म्हणजे दोनशे रुपये शेडका पान मिळायचे. आता काही ठिकाणीच पान उपलब्ध असून तब्बल पाचशे रुपये शेकडा दर सुरू असल्याचे फिरोज पखाली यांनी सांगितले. पश्‍चिम बंगालमध्ये शेतकरी, व्यापाऱ्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे काहीतरी मार्ग काढा आणि देशभरात पान वाहतुकीला मान्यता द्या, अशी मागणी केली आहे. 

पानांचे दर असे 

  • देशी पान ः 100 रुपयांना 150 (पूर्वीचे दर - जैसे थे) 
  • कलकत्ता पान ः 500 ते 600 रुपये शेकडा (पूर्वीचे दर - 200 रुपये शेकडा) 
  • बनारस पान ः 350 रुपये शेकडा (पूर्वीचे दर ः 200 रुपये शेकडा) 

कलकत्त्याहून पान वाहतूकीची प्रतीक्षा

आम्ही तंबाखुमुक्त स्विट पान विक्री करतो. त्यासाठी कलकत्ता पान लागते. साधा पान वापरून बडीशेप पान, गोविंद विडा बनतो. अन्य विड्यांसाठी कलकत्त्याहून पान वाहतूकीची प्रतीक्षा आहे. ग्राहक आमच्याकडे सतत विचारणा करत आहेत. पानशौकीन प्रतीक्षेत आहेत.'' 

- अनिता आवटी, रुची पानमंदिर, सांगली