हिना - रिना म्हशींना आली तब्बल दोन लाखांची किंमत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 जानेवारी 2020

विजयपूर रस्त्यालगत रेवणसिद्धेश्‍वर मंदिरलगतच्या मैदानावर जनावरांचा बाजार भरला आहे. खिलार गायी, बैल आणि म्हशींची मोठी आवक बाजारात झाली आहे. त्यात हिना आणि रिना म्हशींनी सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

सोलापूर : ग्रामदैवत सिद्धेश्‍वर यात्रेनिमित्त भरवण्यात आलेल्या जनावर बाजारात हिना आणि रिना म्हशींनी सर्वांचे लक्ष वेधले. प्रतिदिन 20 ते 25 लिटरपर्यंत दूध देणाऱ्या म्हशी पंढरपूरच्या व्यापाऱ्याने दोन लाख रुपये देऊन खरेदी केल्या. 

विजयपूर रस्त्यालगत रेवणसिद्धेश्‍वर मंदिरलगतच्या मैदानावर जनावरांचा बाजार भरला आहे. खिलार गायी, बैल आणि म्हशींची मोठी आवक बाजारात झाली आहे. त्यात हिना आणि रिना म्हशींनी सर्वांचेच लक्ष वेधले आहे. सोलापुरातील अशोक ख्याडे यांच्या मालकीच्या या जाफराबादी म्हशी आहेत. बाजार सुरू झाल्यापासून हिना व रिनालाच सर्वाधिक किंमत मिळाली आहे. हिना आणि रिना म्हशी एका वेळेस 11 ते 12 लिटर याप्रमाणे दिवसाला साधारण 25 लिटरपर्यंत दूध देतात. त्यासाठी श्री. ख्याडे यांनी त्यांचे संगोपनही तशाच पद्धतीने केले आहे. या म्हशीचा प्रतिदिन 10 किलो सरकी पेंड, 20 किलो गहू भुस्सा, 20 किलो कुट्टी असा खुराक आहे. रोजच्या रोज तिला आंघोळ घालणे, वेळच्या वेळेला खाऊ घालणे याकडे ते आवर्जून लक्ष देतात. त्यांच्या या काळजीपूर्वक संगोपनामुळेच आज त्या बाजारात भाव खाऊन गेल्या आहेत. 

खिलार वळू अन्‌ गीर गायीला मागणी 
बाजारात फिरल्यानंतर खिलार जातीच्या वळू आणि गीर गायीला जास्त मागणी असल्याचे दिसले. येथे महाराष्ट्रसह गुजरात, आंध्र प्रदेश, कनार्टक येथून जनावरे विक्रीस आली आहेत. खरेदी करण्यास याच भागातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांची संख्या जास्त आहे. खिलार वळू दीड ते दोन लाख, बैलजोडीची दोन लाखांपुढे तर म्हशीची किंमत 70 हजारांपर्यंत आहे. हा जनावर बाजार 15 दिवस असतो. बाजारात जवळपास 10 कोटींपर्यंत उलाढाल होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. येथे येणाऱ्या पशुपालकांना पिण्याच्या पाण्याची, दोन वेळच्या जेवणाची आणि विजेची सोय करण्यात आली आहे. जनावरे धुण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. येथे शेतास उपयुक्‍त साहित्यांची दुकाने थाटण्यात आली आहेत. त्याचबरोबर जिल्हा पशुवैद्यकीय केंद्रच्या वतीने एक तसेच मंदिर समितीच्या वतीने एक जनावरांची तपासणी करण्यास दवाखाना उभारण्यात आला आहे. यात जनावरांना आवश्‍यक औषधे येथे मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Came to the buffalo The cost of two lakhs