
सांगली ः बहुचर्चित एरंडोली आणि नरवाड पाणी योजनेच्या चौकशीचा अहवाल रद्द करावा. चौकशी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांनी काही लोकांना जाणीवपूर्वक पांघरूण घालत योजनेच्या अध्यक्ष, सचिवांना दाढेला दिले आहे. ही चौकशी पूर्वग्रहदूषित आणि चुकीच्या पद्धतीने झाली आहे. हा चौकशीचा बोगस अहवाल आहे, असा आरोप आज जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत सदस्यांनी केला.
या योजनेच्या चौकशीची मागणी करणारे माजी बांधकाम सभापती अरुण राजमाने आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ सदस्य जितेंद्र पाटील यांनी अहवालाचा पंचनामा केला. पाटील यांनी टोकदार भाषेत श्री. गुडेवार यांच्याकडे संशयाची सुई रोखली. ते म्हणाले, ""या योजनेच्या मंजुरीपासून आजअखेरपर्यंत ती पूर्ण झालेली नाही. असा दावा करत त्यांनी अध्यक्ष, सचिवांवर 3 टक्के व्याजाने दंडाची शिफारस केली आहे. ही पद्धत नाही.
जिल्ह्यात कित्येक योजना रखडल्या, काही कधीच पूर्ण झाल्या नाहीत. त्यांपैकी किती जणांकडून दंड वसूल केला? दुसरीकडे या योजना पूर्ण झाल्या असून, त्या ग्रामपंचायतीने ताब्यात घेऊन चालवल्या पाहिजेत. एक वर्ष त्याची ट्रायल द्यावी, असेही गुडेवार म्हणताहेत. म्हणजेच योजना पूर्ण झाल्यात, वस्तू जाग्यावर आहेत, मग दंड कसला? पाईपची खरेदी विजयनगरमधून करायची की, कंपनीच्या कारखान्यातून याचा विषयच नाही. ठरल्याप्रमाणे खरेदी झाली की, नाही पाहावे. या साऱ्यात अधिकारी दोषी नाहीत का? त्यांच्यावर पांघरूण घातले गेले. ठेकेदाराची जबाबदारी असताना त्यांच्याकडे दुर्लक्ष केले गेले.''
ते म्हणाले, ""या योजनांची चौकशी करण्यासाठी त्रयस्थ यंत्रणा नेमायला हवी होती. जिल्हा परिषदेच्या यंत्रणेला चौकशीचा अधिकारच नाही. किमान दहा सदस्यांची समिती हवी. कुठे होती समिती? त्यामुळे गुडेवार यांनी दिलेला अहवालच अमान्य करावा. जिल्हा परिषद पाणीपुरवठा यंत्रणा भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारी आहे, त्यांनी चौकशी करावी म्हणजे गंमत आहे.''
जतसाठी प्रादेशिक योजना निरुपयोगीच
जत तालुक्यातील 75 गावांसाठी बिरनाळ तलावातून पाणी नेण्याची योजना सपशेल फसेल, ती रद्दच करावी, अशी आग्रही मागणी तम्मनगौडा रविपाटील यांनी केली. त्याला सरदार पाटील यांनी समर्थन दिले. तालुक्याचा विस्तार पाहता स्वतंत्र पाणीपुरवठा योजनाच कराव्यात, या मुद्याला सीईओ जितेंद्र डुडी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यावर लवकरच निर्णय घेऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली.
गुडेवार तापले; पण...
चंद्रकांत गुडेवार यांनी सदस्यांच्या आक्रमक प्रश्नांना उत्तरे देताना ""पाणीपुरवठा समित्या निर्दोष आहेत, असे तुम्हाला म्हणायचे आहे का? त्यांनी योजनेचे 12 तुकडे पाडले, हे चूक नाही का? पाईप खरेदीत पैसे वाचवता आले नसते का?'' असे सवाल केले. तेही तापू लागले होते; मात्र त्यांनी नंतर शांत राहत संयम दाखवला.
संपादन : युवराज यादव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.