Belgaum : आनंदवाडीतील ४५ घरांचे प्रकरण; रहिवासी आक्रमक, कारवाई रद्द | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Belgaum : आनंदवाडीतील ४५ घरांचे प्रकरण; रहिवासी आक्रमक, कारवाई रद्द

Belgaum : आनंदवाडीतील ४५ घरांचे प्रकरण; रहिवासी आक्रमक, कारवाई रद्द

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : रहिवाशांच्या तीव्र विरोधामुळे आनंदवाडी येथील ४५ घरांचा ताबा घेण्याचा निर्णय वक्फ बोर्डाला गुरुवारी (ता. २५) रद्द करावा लागला. रहिवाशांचा विरोध लक्षात घेऊन वक्फ बोर्डाचे अधिकारी व पदाधिकारी आनंदवाडी परिसरात फिरकलेच नाहीत.

आनंदवाडी येथील घरांचा ताबा वक्फ बोर्डाकडून गुरुवारी घेतला जाणार होता. त्याबाबतचे वृत्त बुधवारी (ता. २४) ‘सकाळ’ने प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके व पदाधिकारी, श्रीराम सेना हिंदुस्थानचे प्रमुख रमाकांत कोंडूसकर, तसेच आनंदवाडी व शहापूर विभागाचे नगरसेवक या कारवाईचा विरोध करण्यासाठी तेथे गेले. रहिवासी मोठ्या संख्येने तेथे जमल्यामुळे टिळकवाडी पोलिस ठाण्याचे सीपीआय राघवेंद्र हवालदार व त्यांचे सहकारीही तेथे पोहोचले. यावेळी कारवाईच्या मुद्द्यावरून सीपीआय हवालगार व रमाकांत कोंडूसकर यांच्यात शाद्बिक चकमक झाली. वक्फ बोर्डाच्या संभाव्य कारवाईच्या विरोधात रहिवाशांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आनंदवाडी परिसरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला.

वक्फ बोर्डाकडून सातत्याने कारवाईचा इशारा दिला जात आहे, नोटीस पाठविली जात आहे. या धसक्याने काही रहिवाशांचा मृत्यूही झाला आहे. ही समस्या कायमची सुटली पाहिजे, अशी मागणीही यावेळी रहिवाशांनी केली, पण घरांचा कब्जा घेण्याचे न्यायालयीन प्रकरण असल्यामुळे मोर्चा काढण्याचा निर्णय तात्पुरता स्थगित ठेवण्यात आला. वक्फ बोर्डाविरोधात कायदेशीर व न्यायालयीन लढ्यासाठी आवश्‍यक ते सर्व सहकार्य करण्याची ग्वाही यावेळी तेथे उपस्थितांनी दिली, पण वक्फ बोर्डाने घरांचा ताबा घेण्याबाबत जो आदेश दिला आहे, त्याला न्यायालयातून स्थगिती घेण्याचा निर्णय यावेळी रहिवाशांनी घेतला.

आनंदवाडी येथील रहिवासी व वक्फ बोर्ड यांच्यातील संघर्ष गेल्या आठ वर्षांपासून सुरू आहे. यावेळी बोर्डाने पोलिस बंदोबस्तात घरांचा ताबा घेण्याचा निर्णय घेतला, पण घरांचा ताबा कोणत्याही स्थितीत घेऊ द्यायचा नाही, असा निर्णय तेथील रहिवाशांनी घेतला. गुरुवारी सकाळी नऊपासून आनंदवाडीतील सर्व रहिवासी एकत्र आले. पंचमंडळी, महिला व तरुण मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्तेही जमले. त्यांना म. ए. समिती, श्रीराम सेना हिंदुस्थान या संघटनेचे पाठबळ मिळाले. त्या विभागाचे नूतन नगरसेवकही आले. वक्फ बोर्डाचा आदेश असल्यामुळे पोलिसांना त्यांचे कर्तव्य पार पाडावे लागेल, त्यामुळे कारवाई तात्पुरती थांबली असली तर कारवाईविरोधात कायदेशीर लढा द्यावा लागेल, असे यावेळी सांगण्यात आले. रहिवाशांनाही हा मुद्दा मान्य झाला. यावेळी उपस्थित सर्व प्रमुखांची भाषणे झाली. पोलिस बंदोबस्त वाढविल्यामुळे काही काळ तेथे तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

loading image
go to top